मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने मदत करण्यास दिलेला नकार आणि काँग्रेसने अतिरिक्त मते देण्यास दर्शविलेली असमर्थता यातूनच शेकापचे जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील मतभेदही समोर आले. मित्रपक्षांनी हात झटकले असताना निवडणूक लढण्याचा जयंत पाटील यांचा हट्ट आणि पुरेशी मते नसतानाही तिसरा उमेदवार उभा करण्याच्या निर्णयाने महाविकास आघाडीचेच हसे झाले.

विधानसभेतील संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येणारे हे निश्चित होते. पण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. १५ मते असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचाही पाठिंबा राष्ट्रवादीने अपेक्षित धरला होता. पण शिवसेना ठाकरे गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली. तसेच नार्वेकर यांच्यासाठी काँग्रेसच्या अतिरिक्त मतांची बेगमी केली. तेव्हाच जयंत पाटील यांचा निभाव लागणे कठीण असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. जयंत पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असतानाही शिवसेनेने परस्पर नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीत योग्य समन्वय साधला गेला असता तर अधिक बरे झाले असते, अशी बोलकी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
maharashtra assembly poll 2024 rajendra raut and dilip sopal supporters clash barshi assembly elections
बार्शीत राजेंद्र राऊत – सोपल गटात गोंधळ; दोन्ही गटांचे आरोप-प्रत्यारोप, तणाव
aam aadmi party slams congress in maharashtra assembly election 2024
काँग्रेसला बंडखोरी रोखता आली नाही ही शोकांकिका कोणी केली ही टीका !
The challenge of insurgency in North Maharashtra including Nashik before Mahayuti and Mahavikas Aghadi
३५ पैकी १४ … नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे आव्हान…

हेही वाचा >>> ‘सारसबाग’ प्रकरणाचे सांस्कृतिक शहरात सामाजिक-राजकीय पडसाद

उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा का दिला नाही ?

शेकापचे जयंत पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळेल, असे राष्ट्रवादीचे गणित होते. पण लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेच्या अनंत गीते यांना शेकाप किंवा जयंत पाटील यांनी शेवटच्या क्षणी मदत केली नाही, असा आरोप झाला होता. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना मदत केल्याची तक्रार गीते यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती. शेकापचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अपेक्षित मते मिळाली नाहीत. तसेच मावळ मतदारसंघातील पनवेल, उरणमध्येही शेकापच्या मदतीबद्दल ठाकरे गट साशंक होता. यामागे जयंत पाटील यांची ‘कुरघोडी’ जबाबदार होती, असे बोलले जाते. यातूनच उद्धव ठाकरे गटाने जयंत पाटील यांना मदत करण्यास ठाम नकार दिला होता. शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना अतिरिक्त मते कशी मिळतील यासाठी प्रयत्न केले. काँग्रेस नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. निवडणुकीच्या दिवशी व आधीही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीच्या ठिकाणी हजेरी लावली.

काँग्रेसनेही हात झटकले

जयंत पाटील यांना काँग्रेसकडून मदतीची अपेक्षा होती. काँग्रेसने पहिल्या पसंतीची दोन मते द्यावी तसेच दुसऱ्या पसंतीची मते नार्वेकर आणि त्यांना वाटून द्यावी, अशी मागणी केली होती. पण काँग्रेसने पहिल्या पसंतीची मते जयंत पाटील यांना दिली नाहीत. तसेच दुसऱ्या पसंतीची मते नार्वेकर यांना हस्तांतरित केली. काँग्रेसने आपल्याला मते दिली नाहीत, असा नाराजीचा सूर जयंत पाटील यांनी पराभवानंतर लावला. जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची १२ मतेच मिळाली. पाटील यांनी अपक्ष, समाजवादी पार्टी व एमआयएमची मते मिळविण्याचा प्रयत्न केला. पण कोणाचीच मते मिळालेली दिसत नाहीत. विधानसभेत शेकापचा एक आमदार असला तरी त्याची भाजपशी जास्त जवळीक आहे. परिणामी ते मतही मिळाले नसावे. कारण आपलीही मते फुटल्याची कबुली जयंत पाटील यांनी दिली.

शेकापची वाटचाल खडतर

एकेकाळी राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद तसेच राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात शामसुंदर शिंदे हे आमदार असले तरी ते नावापुरते शेकापचे आमदार आहेत. त्यांची जवळीक ही महायुतीशी अधिक आहे. ते महायुतीच्या बाकांवरच सभागृहात बसतात. गेली २४ वर्षे आमदार असलेले जयंत पाटील पराभूत झाल्याने विधान परिषदेतही शेकापचे प्रतिनिधित्व संपुष्टात आले. रायगड जिल्ह्यातही पक्षाचा एकही आमदार नाही. एकूणच पक्षाची भविष्यातील वाटचाल खडतर असल्याचेच चित्र दिसते.

आमदार दळवींचा चिखलात लोळून जल्लोष

अलिबाग : विधान परिषद निवडणुकीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला म्हणून अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिखलात लोळले. समाजमाध्यमांवर त्यांचे छायाचित्र आणि चित्रफिती सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला तर मातीत लोळीन, असा निर्धार आमदार महेंद्र दळवी यांनी केला होता. जयंत पाटील यांच्या पराभवासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते करीन पण त्यांना विजयी होऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांच्या या पराभवानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी केलेला निर्धार शनिवारी पूर्ण केला. राजमळा येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चिखलयुक्त मातीत लोळणच घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी हेदेखील उपस्थित होते.

निकटवर्तीय ते विरोधक…

कधी काळी शेकापमधून राजकारणाचे धडे गिरवणारे महेंद्र दळवी हे जयंत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. मात्र नंतर त्यांच्याशीच मतभेद झाल्याने त्यांनी शेकापला सोडचिठ्ठी दिली. आज जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून दळवी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या पराभवाचा आनंद दळवी यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जल्लोष करत साजरा केला.

जयंत पाटील आणि वाद हे समीकरण

● शेकाप सरचिटणीस जयंत पाटील उत्तम नेते, कुशल संघटक असले तरी त्यांचा राग बरेचदा अनावर होतो. त्यामुळे ते बरेचदा वादात सापडतात.

● पेण येथील प्रांताधिकारी कार्यालयात एका बैठकी दरम्यान २०२२ मध्ये जयंत पाटील यांनी पोलीस निरीक्षक पोळ यांना खुर्चीतून उठवले होते. माझ्यासमोर बसायचे नाही. मी आमदार आहे. आमचे अधिकार, राजशिष्टाचार पाळले पाहिजेत. मी तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असा इशाराही दिला.

● २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही पत्रकार काही बातम्या छापता म्हणून ‘लोकसत्ता’च्या रायगड प्रतिनिधीवर हल्ला चढवला होता. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अलिबागच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ● अभिनेता शाहरुख खान यांच्याशी गेट वे ऑफ इंडीया येथे स्पीड बोटीत बसण्यावरून जयंत पाटील यांचा वाद झाला होता.