मोहनीराज लहाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये आणि जिल्ह्यातही खळबळ निर्माण केली आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्र पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. खासदार विखे यांच्या वक्तव्यातून ते जिल्ह्यात, विशेषतः आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात, आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट तर होतेच त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते. दोघांचीही वक्तव्ये ही राजकीयदृष्ट्या मोठी असल्याने त्याला आतून पक्षश्रेष्ठींची संमती तर नाही ना? अशीही खासगीत चर्चा सुरू आहे.

‘शिवसैनिकांशी आपले वैर नाही, आपल्या खासदारकीमध्ये त्यांचा ५० टक्के वाटा आहे. त्यामुळे शिवसैनिकांना आपण विसरणार नाही. त्यांची साथ आपण सोडणार नाही,’ अशी भूमिका भाजप खासदार विखे यांनी जाहीर केली आहे. त्याचवेळी त्यांचे वडील माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी ‘अजित पवार यांनी परत यावे आणि देवेंद्र फडणविसांचे सरकार आणावे’ अशी साद घातली आहे. विखे पिता-पुत्रांनी एकाच दिवशी दोन स्वतंत्र ठिकाणी केलेल्या या वक्तव्यांबद्दल जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे.

अयोध्येची वारी, नाशिकच्या खांद्यावरी

राज्यात शिवसेना व भाजप यांच्यातील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचलेले असताना भाजपच्या खासदाराकडून एकीकडे जिल्ह्यातील शिवसेनेसोबत अशी जवळीक निर्माण करणे आणि दुसरीकडे वडलांनी अजित पवारांना पुन्हा अशी भावनिक साद घालणे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते.

गेल्या काही दिवसांपासून खा. विखे जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात जाताना भाजपपेक्षा वेगळी, आपल्या सोयीनुसार भूमिका घेऊ लागले आहेत. स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार ती असली, तरी भाजपच्या भूमिकेशी सुसंगत आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर शहरात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी विलक्षण सलगी ठेवली आहे. शिवाय नगर शहरातील काँग्रेसचे नगरसेवक पक्षापेक्षा विखे यांच्या संपर्कात अधिक असतात किंवा विखे यांचा भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेस नगरसेवकांशी अधिक संपर्क असतो.

पवार कुटुंबीयांशी असलेल्या परंपरागत राजकीय वैमनस्याला खा. विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्यापुरता तूर्त लगाम घातला आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मर्जीतले समजले जाणारे आमदार नीलेश लंके यांच्यावर जोरदार आरोप सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही, त्या दृष्टीने आमदार लंके यांच्याकडे पाहिले जाते. त्यासाठी शरद पवार यांच्याकडून आ. लंके यांना बळही दिले जाते आहे. आ. लंके यांच्या मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांशी मात्र विखेंचे वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यातूनच त्यांनी शिवसैनिकांना जवळ करण्याची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

भाजपच्या मराठा राजकारणातून विनायक मेटे वजा?

खा. विखे यांचे आजोबा, दिग्गज नेते स्व. बाळासाहेब विखे यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर आपला स्वतंत्र गट कार्यरत ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग राबवला होता. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत खासदारांनी अशाच प्रयोगासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यातूनच ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी राजकीय भूमिका मांडत जिल्हा विकास आघाडीची समीकरणे जुळवू लागले आहेत. त्यांच्या या ‘प्रयोगा’ला अद्याप भाजपच्या वरिष्ठांची संमती मिळाली की नाही हे स्पष्ट झाले नाही. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मात्र विरोध स्पष्ट झालेला आहे.

राज्यसभा निवडणूक निकालाने महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कोलाहल माजलेला असतानाच माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना ‘अजित पवार यांनी पुन्हा आमच्या समवेत यावे आणि राज्यात फडणविसांचे सरकार आणावे,’ अशी साद घातली. खरेतर अजित पवार आणि विखे यांच्यात राजकीय सख्य कधीच नव्हते आणि सध्याही नाही. उलट विखे यांच्या वर्चस्वाखालील मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था बरखास्त करण्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. परंतु तरीही विखे यांनी अजित पवार यांना साद घातली. त्यांच्या या आवाहनामुळे भाजपसहित राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

विखे पितापुत्रांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यांवर भाजपसहित इतर कोणत्याही पक्षांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यापूर्वी विखे काँग्रेसमधून शिवसेना, पुन्हा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि सध्या भाजपमध्ये असले तरी सर्व ठिकाणी त्यांची जिल्ह्यात ते विरुद्ध इतर सर्व अशीच परिस्थिती राहिली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विखे यांच्या जिल्हा विकास आघाडीच्या प्रयोगाला भाजपच्या वरिष्ठांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र त्यापूर्वीच खासदार विखे यांनी जिल्हा विकास आघाडीच्या मोट बांधणीतून स्वतंत्र गट निर्मितीची वाटचाल सुरूच ठेवली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhakrushna vikhe patil bjp mp sujay appeal ajit pawar nagar politics print politics news pmw