दयानंद लिपारे
कोल्हापूर : माणसं जोडण्याची कला, तरुणांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीच्या आधारे राधानगरी- भुदरगडचे तरुण आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघात प्रभाव निर्माण केला आहे. राजकीय पाठबळ नसतानाही कार्यकर्त्यांचे जाळे विणत ‘माझी माणसं माझा विकास’ या सूत्राने त्यांनी मतदारसंघात स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. यामुळे आता त्यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत ‘बाळासाहेबांची शिवसेना’त जाणे पसंत केले. मात्र जनतेला या फुटीचा काहीही फरक पडत नाही, त्यांचा आमदार त्यांच्यासोबत आहे, हीच त्यांची भावना आहे.
४८ वर्षीय आबिटकर यांची राजकीय प्रवासाची वाटा-वळणे कालौघात बदलत गेली. पण सह्याद्रीच्या डोंगररांगांतील मतदारांशी विशेषतः तरुणांशी जपलेली बांधिलकी त्यांनी दिवसेंदिवस दृढ केली. त्यांचे वडील आनंदराव आबिटकर हे बिद्री साखर कारखान्यात एक कर्मचारी होते. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. मुलगा आमदार झाला तरी अजूनही कोणाचे कसले न कसले काम घेऊन ते शासकीय कार्यालयात फेऱ्या मारताना आजही दिसतात.
हेही वाचा : महेश खराडे : रस्त्यावरच्या लढाईतील योध्दा
प्रकाश यांनी शालेय दशेत असतानाच राजकीय प्रगती करायची असेल तर कूस बदलली पाहिजे हे ठरवून टाकले. महाविद्यालयीन निवडणुका जिंकत राजकीय प्रभाव दाखवून द्यायला सुरुवात केली. युवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्युदो खेळात प्रावीण्य मिळवलेल्या या तरुणाने क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उठवायला सुरुवात केली. विकासापासून वंचित असलेल्या या दुर्गम भागातील तरुणांना आपलेसे वाटणाऱ्या नेतृत्वाचा शोध सुरू होता. त्यांना आबिटकर यांच्या रूपाने एक आशादायक प्रकाश गवसला. तरुण, खेळ आणि आबिटकर असे मैत्र जुळले. ते पुढे राजकारणातील चढत्या भाजणीचा प्रवास करताना उपयोगी ठरले.
एवढे असले तरी प्रस्थापितांविरोधातील संघर्ष काही सोपा नव्हता. पदवीधर झाल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी अपक्ष म्हणून लढताना ते पंचायत समिती सदस्य, उपसभापती झाले. पाठोपाठ जिल्हा परिषदेची निवडणूकही जिंकली. याच काळात मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार के. पी. पाटील यांच्या सान्निध्यात ते आले. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादी प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. पाटील यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून मतदार संघाच्या संपर्क यंत्रणेचे काम सोपवले. हेच काम त्यांना पुढे घेऊन जाण्यास साहाय्यभूत ठरले. संधीचा पुरेपूर वापर करत त्यांनी कडे-कपारीतील अल्पशिक्षित खेडुतांशी आपली ओळख अधिक घट्ट केली.
हेही वाचा : अब्दुल सत्तार: शिवराळ भाषा व आक्षेपार्ह वर्तन हीच ओळख
विधानसभा निवडणूक लढवण्याचे मनावर घेतल्यावर पहिल्याच निवडणुकीत लक्षणीय मते घेऊन त्यांनी प्रस्थापितांना सूचक इशारा दिला. पुढे २०१४ साली त्यांनी राजकीय गुरू के. पी. पाटील यांना पराभूत केले. गेल्या निवडणुकीतही त्यांचीच पुनरावृत्ती केली. ही वाटचाल करत असताना त्यांनी दूरदृष्टीने पावले टाकून निवडून यायचे असेल तर कोणाला उभे केले पाहिजे हे जाणले. आपला विजयाचा मतांचा गठ्ठा कायम ठेवायचा आणि विरोधकांच्या मतांमध्ये फूट पाडायची याची धोरणीपणाने अंमलबजावणी केल्याने यशाचा आलेख उंचावत गेला.
राज्यात सत्ता बदल होत असताना आबिटकर यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. शिवसेनेकडून दोनदा निवडून आलेले आणि जिल्ह्यात पक्षाचे एकमेव आमदार असलेले अबिटकर हे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेचे जिल्ह्यातील संख्याबळ शून्यावर आले. मुख्यमंत्र्यांशी सलगी झाल्याने मतदार राधानगरी अभयारण्य, भुदरगडसह अन्य गडकोट-किल्ल्यांच्या विकासाची कामे मार्गी लावली. पश्चिम घाटातील या संवेदनशील भागात पर्यटनाला उभारी मिळावी याकडे विशेष लक्ष पुरवले.
महिला बचत गट, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, व्याख्यानमाला या उपक्रमांना चालना दिल्याने या वर्गात त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेगळी वाट चोखाळत बंधू अर्जुन यांना निवडून आणले. राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यावरण, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या या लोकप्रतिनिधीचा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार असा गौरव केला जात असताना त्यांना मात्र मंत्रिपदाचे आणि आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे वेध लागले आहेत.