2017 Congress-SP Alliance केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडी मैदानात उतरली आहे. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल सात वर्षांनंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षात जागावाटपावर अनेक मतमतांतरं पाहायला मिळाली. परंतु, अखेर काँग्रेस आणि सपा यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १७, तर सपा ६३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर चार दिवसांनी समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव रविवारी आग्रा येथील राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले. दोन्ही नेत्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. २०१७ मध्येही काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युती केली होती. मात्र, या युतीचा फारसा फायदा दोघांनाही झाला नाही. यंदाच्या निवडणुकांमध्ये २०१७ ची पुनरावृत्ती होईल की नवा इतिहास घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. २०१७ च्या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं होतं? यावर एक नजर टाकूया.
सात वर्षांनंतर अखिलेश यादव आणि राहुल गांधी रविवारी आग्रा येथे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा एकत्र आले. राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव एकत्र आल्याने २०१७ च्या आठवणींना उजाळा मिळाला. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी या तिघांनीही विजय रथातून प्रचार केला होता. दोन्ही पक्षांतील नेते यंदाच्या निवडणुकीत २०१७ ची पुनरावृत्ती होणार नाही, अशी आशा व्यक्त करत आहेत. २०१७ च्या निवडणुकीतील परिणामाने दोन्ही पक्षांना धक्का बसला होता. उत्तर प्रदेशमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने केवळ ४७ जागा जिंकल्या होत्या. २०१२ मध्ये २२४ जागा जिंकून सत्तेवर आलेल्या सपासाठी हा खूप मोठा धक्का होता, तर काँग्रेसने या निवडणुकीत केवळ सात जागा जिंकल्या. २०१२ च्या निवडणुकीत हा आकडा २८ होता.
२०१७ आणि २०२४ मधील साम्य
२०१७ आणि २०२३-२४ मध्ये युतीची चर्चा निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू झाली. यादरम्यान दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आलेत. अखेर पक्षश्रेष्ठींनी यात हस्तक्षेप करून पक्षापक्षातील मतभेद दूर केले. २०१७ मध्ये दोन्ही पक्षांचे एकमत होण्यासाठी वेळ लागला. या निवडणुकीत काँग्रेसने ११० जागांची मागणी केली, तर सपाने १०० जागा देऊ केल्या. यावेळीही सोनिया गांधी, गुलाम नबी आझाद यांसारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी युती स्थापन व्हावी यासाठी पुढाकार घेतला. प्रियांका यांनी अखिलेश आणि सपा नेते आझम खान यांची भेट घेतली. या बैठकीनंतर, सपा २९८ जागा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली, तर काँग्रेसने १०५ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. घोषणेच्या काही दिवसांनंतर सपाने २०८ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात काँग्रेसला दिलेल्या १० जागांवरही सपाने आपले उमेदवार उभे केले.
यंदा जानेवारीपासून काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती आणि सपाची समन्वय समिती यांच्यात जागावाटपासाठी बैठक घेण्यात आल्या. २०१९ च्या निवडणुकीत सपाने जिंकलेल्या रामपूर आणि मुरादाबादसह लोकसभेच्या २८ जागांची मागणी काँग्रेसने केली होती. सपाने वाराणसी आणि अमरोहा येथे आपले उमेदवार उभे केले. पूर्वी सपाने या दोन्ही जागा काँग्रेसला देणार असल्याचे आश्वासन दिले होते. २०१७ मध्ये जे घडले तसेच काहीसे पुन्हा घडत होते. अखिलेश यांनी ३१ जागांसाठी आधीच आपले उमेदवार जाहीर केले आणि रायबरेलीतील भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासही नकार दिला. या घडामोडींनी चर्चांना उधाण आले. २०१७ प्रमाणे, प्रियांका गांधी वाड्रा यांनी यात हस्तक्षेप केला आणि गेल्या बुधवारी अखिलेश यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी सपाने काँग्रेससाठी अमरोहा आणि वाराणसीसह १७ जागा सोडण्यास सहमती दर्शविली. उर्वरित ६३ लोकसभा जागांवर आपले उमेदवार आणि मित्रपक्षांना सामावून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
२०१७ मध्ये अधिकृत आमंत्रण न दिल्यामुळे आणि जागावाटपाची स्पष्टता नसल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सुलतानपूरमधील अखिलेश यादव यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होण्यास नकार दिला होता, तर यंदा अखिलेश यादव यांनीही हेच कारण पुढे करत भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यास नकार दिला. या यात्रेत सपा कार्यकर्त्यांनीदेखील सुरुवातीला सहभागी होणे टाळले.
“भाजपा हटाओ, देश को बचाओ”चा नारा
२०१७ आणि २०२४ मध्ये मोठा फरक असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. “आम्ही भूतकाळापासून धडा घेत यावेळी युती केली. या आघाडीकडे नेतृत्व करणारे लोक आहेत, यामुळे आमचा विजय निश्चित आहे”, असे काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले. आणखी एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, युतीमध्ये जगावाटपावरून चर्चा होणे साहजिक आहे. “काँग्रेसच्या संघटनात्मक त्रुटींमुळे २०१७ मध्ये युती अयशस्वी ठरली. परंतु, यावेळी लोकांचा कल आमच्या बाजूने आहे”, असे पक्षाचे पदाधिकारी म्हणाले. २०१७ च्या तुलनेत दोन्ही पक्षप्रमुखांना चांगला अनुभव आहे, असे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : Loksabha Election: गुजरातमधील भरुचमध्ये आप-काँग्रेसमध्ये जागावाटपावरून मतभेद; नेमके प्रकरण काय?
“भाजपा हटाओ, देश को बचाओ (भाजपाला हटवा, देशाला वाचवा),” असे अखिलेश यादव यांनी आग्रा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशमधील सर्व ८० लोकसभा जागांवर सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणे, हा २१ फेब्रुवारीला झालेल्या जगावाटपाचाच परिणाम आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतील परिणाम काय असतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.