दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पर्धा परीक्षेचा मार्ग सोडून राहुल चिकोडे यांच्या जीवनाच्या वाटा राजकीय वळणावर स्थिरावल्या. भाजप हा पक्ष आश्वासक वाटल्याने येथेच राजकीय कारकीर्द उंचावण्यासाठी काही करता येत अशा भावनेने कार्यरत राहिले. कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी २५ वर्षाच्या कारकिर्दीत स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे.

वडील गटविकास अधिकारी. त्यांच्याप्रमाणे आपणही वरिष्ठ शासकीय अधिकारी व्हावे असे स्वप्न राहुल या तरुणांने बाळगलेले. जोमाने तयारीही केली होती. दुर्दैवाने सात महिन्याच्या अवधीत आई-वडिलांचे छत्र हरपले. भाऊ, बहीण यांच्या समवेत घरगृहस्थी सांभाळत असताना सामाजिक कार्याचे वेध लागले. राजकारणही खुणावत होते. काँग्रेस, शिवसेना हे पर्याय मानवणारे नव्हते. सामान्यांची राजकीय कारकीर्द उंचावू शकणारा पक्ष अशी धारणा झाल्याने १९९७ साली राहुल यांनी हाती कमळ घेतले.

हेही वाचा… राजेश्वर चव्हाण : एकनिष्ठ नेते

अभाविप, भाजयुमो आणि भाजप अशा एकेक पायऱ्या चढत आज राहुल कोल्हापूर भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष आहेत. भाजप मध्ये सक्रिय झाल्यावर चंद्रकांत पाटील यांच्याशी जवळीक वाढली. चंद्रकांतदादांच्या दोन्ही पदवीधर निवडणुकावेळी राहुल हे त्यांचे प्रकाशक, प्रचार प्रमुख होते. दादा आमदार ते मंत्री असा प्रवास उंचावत असताना राहुल त्यांचे स्वीय सहाय्यक होते. दादांच्या सर्व प्रकारच्या कामाची जबाबदारी राहुल यांच्याकडेच आली. ‘दादांच्या सावलीतील कार्यकर्ता’ या प्रतिमेतून बाहेर येत पुढे राहुल यांनी स्वतःचेही अस्तित्व निर्माण केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे संचालक राहिलेले राहुल हे स्काऊटचे प्रमुख आहेत.

हेही वाचा… देवेंद्र भुयार : शेतकरी आंदोलक ते आमदार

कला शाखेची पदवी घेतलेल्या राहुल यांना पुस्तक वाचन, व्यायाम, प्रवास याची आवड आहे. कै. भालचंद्र चिकोडे स्मृती वाचनालयाच्या माध्यमातून युवकांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. विद्या प्रबोधिनी, संवेदना सोशल फाउंडेशन, भक्तजन प्रणित सांस्कृतिक मंडळ याचे अध्यक्षपद राहुल यांच्याकडे आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, युवक कल्याण आदी कार्याचा व्यापक पट राहुल यांनी दशकभरात उभा केला आहे. रक्तदान शिबिर, फिरते ग्रंथालय, मुलांसाठी मोफत माहितीपर चित्रपट, सामुदायिक कुंकुमार्चन, अथर्वशीर्ष पठण, ताणमुक्त परीक्षा यश कार्यशाळा, संस्कृत – बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग, वृक्षारोपण, पाच रुपयात चपाती भाजी, महिलांसाठी स्वच्छतागृह आरोग्य शिबिर, पदभ्रमंती मोहिम, वाड्या वस्तीवरील मुलांसाठी पर्यटन सहल, पर्यटनासाठी आड वाटेवरचे कोल्हापूर उपक्रम, महिलांसाठी नवदुर्गा दर्शन सहली, शेतकऱ्यांसाठी बी बियाणे संकलन, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, महिलांसाठी व्यायाम शाळेचे साहित्य वाटप,अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट, रोजगार मेळावा, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिर, शिवाजी द ग्रेट हे सर्वात मोठे शिवचरित्र भारतातील सर्व विद्यापीठातील ग्रंथालयांना भेट अशा उपक्रमांमध्ये राहुल सतत व्यस्त असतात. कोल्हापूर दक्षिण व उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक पक्षाच्या बेरजेच्या राजकारणाच्या धोरणामुळे उमेदवारीची संधी चुकली पण आगामी विधानसभा निवडणुकीत उतरून विधिमंडळात जाण्याचा राहुल चिकोडे या तरुणाचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul chikode aim oriented personality young politician print politics news asj