काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी सध्या केदारनाथ दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा वैयक्तिक स्वरुपाचा असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या दौऱ्यात केदारनाथमध्ये मंगळवारी (७ नोव्हेंबर) राहुल गांधी आणि भाजपाचे नेते वरुण गांधी यांची भेट झाल्याचे म्हटले जात आहे. यावेळी वरुण गांधी यांच्या पत्नी यामिनी आणि मुलगी अनसूया यादेखील होत्या. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. राहुल गांधी आणि वरुण गांधी हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत.
वरुण आणि राहुल गांधी चुलत भाऊ
वरुण गांधी हे संजय आणि मनेका गांधी यांचे पुत्र आहेत. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी आणि संजय गांधी हे दोघेही एकमेकांचे भाऊ होते. राहुल गांधी आणि वरुण गांधी या दोन्ही नेत्यांत वैचारिक मतभेद आहेत. वरुण गांधी हे भाजपाचे खासदार आहेत. वरुण गांधी यांच्या आई मनेका गांधी यादेखील भाजपाच्या नेत्या आहेत.
“माझा गळा चिरला तरी…”
राहुल गांधी यांना याच वर्षाच्या (२०२३) जानेवारी महिन्यात पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता. भारत जोडो यात्रा देश जोडते आहे. तुम्ही तुमचं कुटुंबही जोडणार का? वरूण गांधी हे तुमचे भाऊ आहेत त्यांना तुम्ही भेटणार का? त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करणार का? असे राहुल गांधी यांना विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना “वरूण गांधी हे भाजपात आहेत. ते जर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. पण माझी आणि वरूण गांधी यांची विचारधारा वेगवेगळी आहे. माझी विचारधारा वेगळी आहे. मी कधीही संघ मुख्यालयात जाऊ शकत नाही. गळा चिरला तरीही मी संघ मुख्यालयात किंवा कुठल्याही संघ कार्यालयात जाणार नाही. माझं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरूण गांधी आहेत त्यांनी एक अशी वेळ होती की वेगळी विचारधारा निवडली. मी ही गोष्ट कधीही मान्य करू शकत नाही. मी वरूण गांधींना भेटू शकतो, त्यांना आलिंगन देऊ शकतो मात्र त्यांची विचारधारा मी कधीच अंगिकारू शकत नाही. कधीच नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत,” असे राहुल गांधी म्हणाले होते.
भाजपाने काय प्रतिक्रिया दिली ?
राहुल गांधी आणि वरुण गांधी हे मंदिर परिसरातच एकमेकांना भेटल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे अगदी थोड्या वेळासाठीच ही भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले जात आहे. या भेटीवर उत्तराखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली. “वरुण गांधी यांच्यात राहुल गांधी यांना सनातन धर्माकडे आणण्याची क्षमता असून ती चांगली बाब आहे. काँग्रेस पक्ष सनातन धर्माकडे झुकत आहे,” असे भट्ट म्हणाले.