जळगाव /जामोद: आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण व आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, अशा शब्दांत आदिवासींच्या अधिकारांसाठी पाठिंबा व्यक्त करत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पारंपरिक आदिवासी मतदारांना भावनिक-राजकीय साद घातली.
जळगाव जामोदमध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात राहुल गांधी यांनी काँग्रेस पासून दुरावलेल्या या मतदारांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यासाठी संवाद साधला. आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्त्वाचा आहे, पर्यावरणशी तुमचे नाते घट्ट आहे आणि ते महत्त्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे. काँग्रेसने आदिवासींसाठी पेसा कायदा, वन हक्क कायदा दिला पण ती काही तुम्हाला भेट दिलेली नाही तर तो तुमचा हक्क आहे, अधिकारच आहे. तुमचा हक्क आहे तोच काँग्रेस सरकारने तुम्हाला दिला. या जमिनीवर पहिले पाऊल आदिवासींनी टाकले पण पंतप्रधान आदिवासींसाठी नवा शब्द वनवासी उच्चारतात.
हेही वाचा: मंत्रिपदाची चर्चा अन् समर्थक आमदारांच्या मतदारसंघावर मुख्यमंत्री शिंदे यांची मेहरनजर
आदिवासी व वनवासी या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आदिवासी मालक आहेत तर वनवासी म्हणजे जंगलमध्ये राहणारा म्हणजेच शहरात राहू न शकणारा, शिक्षण न मिळू शकणारे, जंगल संपले तर तुमचे अस्तित्वही संपेल आणि पंतप्रधान तुमच्या हक्काचे जंगल काही उद्योगपतींना देत आहेत. तुमच्या अस्तित्वावर घाला घातला जात आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा: महेश शिंदे : विकासकामांची दूरदृष्टी
काँग्रेस पक्षाने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण देऊन राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व दिले. महिला, आदिवासी, दलित, वंचित समाज घटकाला न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपाचा मुली, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बलात्काराला मुलींचे कपडे जबाबदार असल्याचे सांगत मुलींनाच चूक ठरवले जाते. बलात्कार कपड्यामुळे होत नाहीत त्यात मुलीची चुक नसते जर कोणी गुन्हेगार असेल तर तो बलात्कारी.. भाजपावाले महिलांचा सन्मान न करता त्यांचा अपमान करतात.