Rahul Gandhi: बसपाच्या प्रमुख मायावती आणि काँग्रेस नेते तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात सध्या आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याची सुरुवात केली ती राहुल गांधींनी. ज्यानंतर मायावतींनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी मायावतींवर टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाही. भाजपाच्या विरुद्ध मायावती यांनी इंडिया आघाडीला साथ का दिली नाही? असा सवाल राहुल गांधींनी केला. त्यानंतर मायावतींनी तर काँग्रेसला भाजपाची बी टीम म्हटलं आहे. नेमका हा वाद काय? आपण जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांनी काय वक्तव्य केलं होतं?

राहुल गांधी असं म्हणाले होते की मायावती या जर इंडिया आघाडीच्या बरोबर असत्या तर मागच्या वर्षी एनडीएला लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळवता आली नसती. मात्र मायावतींनी भाजपाचा फायदा होऊ दिला. ही टीका केल्यानंतर मायावतींनीही त्यांना उत्तर दिलं.

मायावतींचं उत्तर काय?

मायावती म्हणाल्या, “काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. भाजपाची बी टीम म्हणून त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काम केलं. त्यामुळेच दिल्लीत भाजपाची सत्ता आली. काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं अशी अवस्था दिल्लीत झाली नसती. पण काँग्रेसने भाजपाचा फायदा होऊ दिला.” अशी बोचरी टीका मायावतींनी केली आहे.

इंडिया आघाडीत मायावती न आल्याने राहुल गांधींंनी व्यक्त केली नाराजी

उत्तर प्रदेशच्या रायबरेली या ठिकाणी झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, भाजपाच्या विरोधात आम्ही एकत्र येऊन लढलो. मात्र मायावतींनी आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला साथ दिली नाही. आम्हाला याचं दुःख झालं. जर मायावतीही इंडिया आघाडीत आल्या असत्या तर भाजपाला विजय मिळाला नसता. मात्र यानंतर मायावतींनी राहुल गांधींना असा सल्ला दिल्ला आहे की इतरांना उपदेश करण्यापेक्षा जरा स्वतःच्या पायाखाली काय जळतं आहे ते बघा. मायावती दिल्ली विधानसभा निवडणुकीचं उदाहरण देऊन काँग्रेसवर टीका करत आहेत. कारण या निवडणुकीत काँग्रेसच्या आधी आम आदमी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीत येणं पसंत केलं होतं. तरीही विधानसभा निवडणूक वेगळी लढवली. हे उदाहरणही मायावतींनी राहुल गांधींना दिलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि आप या दोन पक्षांनी एकमेकांवर टीकाही केली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपने दिल्लीच्या सात लोकसभा जागांवर आघाडी केली होती. तरीही या सगळ्या जागा भाजपानेच जिंकल्या होत्या.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

दरम्यान या सगळ्या आरोपांच्या फैरी सुरु असतानाच संजय राऊत यांनी म्हटलं आहे की आम्ही सपा आणि काँग्रेसच्या आघाडीची जादू लोकसभा निवडणुकीत पाहिली आहे. ज्या जागा गेल्या त्या मायावतींमुळे गेल्या. कारण त्या इंडिया आघाडीत आल्या नाहीत. दरम्यान भारतीय समाज पार्टीचे नेते सुहेलदेव यांनी म्हटलं आहे की सपा म्हणजेच समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष दोन्ही भाजपाच्या बी टीम आहेत. वेळोवेळी त्यांनी भाजपाची मदत केली आहे. आता या आरोपांच्या फैरी आणखी किती दिवस चालतात आणि त्याला कुठलं वळण लागतं हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.