काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सातत्याने पुढे जात आहे. सर्व काही योजनेनुसार सध्या तरी सुरू आहे. पण आता ही योजना बदलली जाऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. राहुल गांधींचा हा दौरा आता नियोजित वेळेच्या १० दिवस आधी संपण्यात येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेत बदल होणार असल्याची चर्चा आहे. आता ही यात्रा ओडिशापर्यंत पोहोचली आहे. दौऱ्यातून विश्रांती घेत राहुल गांधी दिल्लीत आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान आपला वेग वाढवला आहे. आतापर्यंत या यात्रेचा प्रवास दररोज सुमारे ६०-७० किलोमीटर अंतर कापत होता, तो आता दररोज १००-११० किलोमीटर करण्यात आला आहे. योजनेनुसार २० मार्च रोजी त्यांचा प्रवास पूर्ण होणार होता. मात्र आता तो १० दिवस आधी १० मार्च रोजी मुंबईत संपवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या योजनेला कात्री
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १६ फेब्रुवारीला चांदौलीमार्गे उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशात सुमारे ११ दिवस चालणार असून, सुमारे २० जिल्ह्यांतून जाणार आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागातील बहुतेक जिल्हे यात्रेतून वगळले जाणार असून, राहुल गांधींची यात्रा थेट लखनौ ते अलिगढ आणि नंतर आग्रा असा प्रवास करेल. “राहुल गांधींना वाटेत इतर अनेक पक्षांच्या नेत्यांशी आणि समूहांशी संवाद साधण्यासाठी अधिक वेळ मिळेल, याची खात्री करण्यासाठी आम्हाला यात्रेचा वेग कमी करायचा होता,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
रायबरेलीच्या यात्रेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव सहभागी होणार आहेत. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे काही जिल्हे वगळले जाणार आहेत. यापूर्वी राहुल गांधी यांनी ११ दिवसांसाठी यूपीमधील विविध ठिकाणी भेटी देण्याची योजना होती, ती ६-७ दिवसांपुरती मर्यादित करण्यात आली. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १९ फेब्रुवारी रोजी त्यांचा माजी लोकसभा मतदारसंघ अमेठी येथे पोहोचणार आहे. यादरम्यान ते अनेक जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल सिंह यांनी सांगितले की, काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १९ फेब्रुवारी रोजी प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर विधानसभा मतदारसंघातील अथेहा येथून अमेठी विधानसभेच्या मतदारसंघात प्रवेश करेल. यानंतर ही यात्रा अमेठी, गौरीगंज, गांधीनगर, जैस, फुरसातगंजमार्गे महाराजपूरमार्गे रायबरेलीकडे रवाना होईल. यादरम्यान राहुल गांधी गौरीगंजमधील बाबूगंज सागरा आश्रमाजवळ जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. फुरसातगंजमध्ये ते रात्री विश्रांती घेतील.
हेही वाचाः उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा नवा प्रयोग, जाट समाजाच्या मतांसाठी आरएलडीशी युती? वाचा नेमकी रणनीती काय?
राहुल गांधी २००२ ते २०१९ पर्यंत अमेठीचे खासदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी राहुल गांधी त्यांची बहीण प्रियंकाबरोबर अमेठीला गेले होते. राहुल यांनी प्रियंका यांच्याबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने मुसाफिरखाना येथे जाहीर सभेला संबोधित केले होते.
इंडिया आघाडीने या महिन्याच्या अखेरीस कर्नाटकमध्ये पहिली संयुक्त रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड), तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयातून बाहेर पडल्यानंतर इंडिया आघाडीमध्ये गोंधळ उडाला आहे. तसेच आरएलडीसुद्धा संभाव्य बाहेर पडण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने काँग्रेस आपल्या सर्व इंडिया आघाडीतील सहयोगी पक्षांना रॅलीसाठी आमंत्रित करेल.