संजीव कुळकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीहून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला दोन महिने पूर्ण होत असतानाच ‘मुझे चलते जाना है; बस चलते जाना…!’ म्हणत निघालेले सव्वाशे भारतयात्री सोमवारी नांदेड जिल्ह्यात दाखल होत असून तेलंगणाच्या सीमेवरील देगलूर शहरात सायंकाळी या यात्रेचे महाराष्ट्र प्रदेश तसेच नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

गेल्या ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा १२ राज्यांतून मार्गक्रमण करीत जम्मु-काश्मीरमध्ये नवीन वर्षामध्ये पोहोचणार आहे. वैविध्याने नटलेल्या भारत देशाची एकात्मता, अखंडता व बंधूभाव अबाधित राखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या या यात्रेला अनेक राजकीय पक्षांसह देशातील विविध संघटना व सामाजिक संस्थांनी समर्थन दिले असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील स्वागत-नियोजनाचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी येथे नमूद केले.

हेही वाचा… भारत जोडो’ यात्रेसाठी नांदेडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त; काँग्रेस प्रभारी एच. के. पटेल यांच्याकडून पाहणी

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र-तेलंगणा या राज्यांमधून प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर या यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सुरू होत असताना या यात्रेच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे, नसीम खान, पक्षसंघटनेतील पृथ्वीराज साठे, चारुलता टोकस, मोहन जोशी, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेते नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे १० नोव्हेंबर रोजी नांदेडमधील सभेमध्ये सहभागी होणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा… राहूल गांधींच्या ‘भारत जोडो’त रायगडच्या नंदा म्हात्रेंचा सहभाग

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही यात्रा सोमवारी सायंकाळी देगलूर शहरात आल्यानंतर खासदार गांधी व इतर भारतयात्री त्या परिसरातच मुक्काम करणार होते. पण आता ८ तारखेच्या गुरूनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात बदल करण्यात आला असून राहुल गांधी व इतर नेते देगलूरहून १०-१२ कि.मी. अंतरावर असलेल्या वन्नाळी गावाकडे पदयात्रेने जाणार आहेत. रात्री १२ च्या सुमारास राहुल गांधी येथील गुरूद्वारात दर्शन घेऊन प्रार्थनेत सहभागी होणार आहेत. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता वन्नाळीहून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात होईल. ८ व ९ नोव्हेंबर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करून ही यात्रा १० तारखेला दुपारी ३ वाजता नांदेड शहरात दाखल होईल. शहरातल्या देगलूर नाका भागातून खासदार गांधी यांची पदयात्रा सुरू होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा… महेश खराडे : रस्त्यावरच्या लढाईतील योध्दा

राहुल गांधी यांची यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्याच दिवशी नांदेड शहरात या यात्रेच्या महाराष्ट्रातील स्वागतासंबंधीची पहिली बैठक नांदेड शहरात माणिकराव ठाकरे व अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नंतरच्या टप्प्यात काँग्रेस पक्षाने प्रमुख कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. मागील पंधरवड्यात यात्रेचा मार्ग, मुक्कामाची स्थळे, भोजन व इतर व्यवस्था या सर्व बाबींना अंतिम रूप देण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते ही यात्रा भव्य करण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, भाकप, पीरिपा इत्यादी पक्षांसह वेगवेगळ्या संघटनाही भारतयात्रींचे स्वागत करणार आहेत.

राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून व प्रत्यक्ष सहभागातून निघालेल्या भारत जोडो यात्रेला आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य लोक या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पुढच्या टप्प्यात या यात्रेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. तसेच एकंदर प्रतिसाद पाहता ही यात्रा देशात एक नवा इतिहास घडवेल, असा विश्वास काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केला. पोलीस प्रशासनाने यात्रेदरम्यान मोठा बंदोबस्त नियोजित केला आहे.


मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi bharat jodo yatra going to enter in maharashtra at nanded district print politics news asj