आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन, काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत न्याय यात्रे’चे आयोजन केले आहे. या यात्रेला मणिपूर राज्यापासून सुरुवात होणार असून, ती महाराष्ट्रात संपणार आहे. १४ जानेवारी ते ३० मार्च या कालावधीत ही यात्रा होईल. ही यात्रा संपल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या ‘भारत जोडो यात्रे’चा काँग्रेसला नेमका काय फायदा झाला? काँग्रेसला मिळणारी मते वाढली का? यावर टाकलेली नजर…
भारत न्याय यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करणार आहेत. या यात्रेदरम्यान एकूण ६,२०० किमीचा प्रवास केला जाणार असून, ही यात्रा एकूण १४ राज्यांतील ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. याआधीच्या भारत जोडो यात्रेत पाच महिन्यांच्या कालावधीत राहुल गांधी यांनी एकूण १२ राज्यांतील ७५ जिल्ह्यांतून प्रवास केला होता.
हिंदी पट्ट्यात यात्रेचा काय परिणाम?
याआधीची भारत जोडो यात्रा कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतून गेली होती. या राज्यांत नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. कर्नाटक, तेलंगणा या राज्यांत काँग्रेसला या यात्रेचा फायदा झाला. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या हिंदी पट्ट्यातील राज्यांत मात्र काँग्रेसला या यात्रेचा म्हणावा तेवढा फायदा झालेला नाही. गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांतून भारत जोडो यात्रा गेली नव्हती.
कर्नाटकमध्ये काय झाले?
कर्नाटकमध्ये या वर्षाच्या १० मे रोजी विधानसभेची निवडणूक झाली होती. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गाधी ३० सप्टेंबर २०२२ रोजी कर्नाटक राज्यात गेले होते. तेथे त्यांनी २१ दिवसांत म्हैसूर, बाल्लारी, रायचूर या जिल्ह्यांतून प्रवास केला.
२०२३ साली काँग्रेसने मारली बाजी
२०१८ सालच्या निवडणुकीत या प्रदेशातील एकूण २० जागांपैकी नऊ जागांवर भाजपाचा विजय झाला; तर काँग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या. जेडीएस पक्षाचा सहा जागांवर विजय झाला. भारत जोडो यात्रेनंतर २०२३ साली झालेल्या निवडणुकीत याच प्रदेशात काँग्रेसचा २० पैकी १५ जागांवर आणि भाजपाचा व जेडीएसचा अनुक्रमे दोन व तीन जागांवर विजय झाला होता. म्हणजेच भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला कर्नाटकमध्ये फायदा झाला होता.
तेलंगणा राज्यातही फायदा
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर २०२३ रोजी विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने बीआरएस पक्षाला पराभूत केले. भारत जोडो यात्रा २३ ऑक्टोबर रोजी या राज्यात पोहोचली होती. एकूण १२ दिवसांत ही यात्रा नारायण पेठ, महबूबनगर या जिल्ह्यांतील एकूण २९ विधानसभा मतदारसंघांतून गेली होती.
बीआरएसला फटका
२०१८ साली बीआरएस पक्षाने २९ पैकी २२ जागांवर विजय मिळवला होता. उर्वरित जागांवर एमआयएमने बाजी मारली होती. काँग्रेसला येथे एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. दरम्यान, आताच्या निवडणुकीत एकूण २९ जागांपैकी १२ जागांवर काँग्रेसचा विजय झाला; तर बीआरएस पक्षाचा १० जागांवर विजय झाला. एमआयएमने या निवडणुकीतही सात जागांवर विजय मिळवला. म्हणजेच काँग्रेसला तेलंगणात भारत जोडो यात्रेचा फायदा झाला.
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काय स्थिती?
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मात्र काँगेसला भारत जोडो यात्रेचा फायदा झाला नाही. गेल्या वर्षाच्या २३ नोव्हेंबर रोजी ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली होती. एकूण १६ दिवसांत या यात्रेने उज्जैन व इंदोर या जिल्ह्यांतून प्रवेश केला होता. ही यात्रा २१ विधानसभा मतदारसंघांतून गेली होती. २०१८ साली या जागांपैकी तीन जागांवर काँग्रेस, तर १८ जागांवर भाजपाचा विजय झाला होता. २०२३ सालच्या निवडणुकीत भाजपाचा १७, तर काँग्रेसचा चार जागांवर विजय झाला होता. याच २१ जागांसंदर्भात विचार करायचा झाल्यास काँग्रेसला मिळणारी मते ११.३ टक्क्यांनी कमी झाली आहेत.
१८ दिवसांत २२ मतदारसंघांतून प्रवास
राजस्थानमध्येही काँग्रेसला भारत जोडो यात्रेचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. ही यात्रा ४ डिसेंबर २०२३ रोजी राजस्थानमध्ये पोहोचली होती. या यात्रेने एकूण १८ दिवसांत राजस्थानमध्ये झालवार, दौसा, सवाई माधोपूर, अलवर या जिल्ह्यांतील २२ विधानसभा मतदारसंघांतून प्रवास केला होता.
काँग्रेसला फटका; भाजपाची बाजी
२०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत २२ जागांपैकी काँग्रेसचा १३, तर भाजपाचा पाच जागांवर विजय झाला होता. उर्वरित तीन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आला. भाजपाने ११ जागांवर विजय मिळवला.
ही परिस्थिती पाहता, काँग्रेसच्या या भारत न्याय यात्रेला किती यश मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.