आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाला पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विरोधक एकत्र येत आहेत. त्यासाठी २३ जून रोजी पटणा येथे बैठक पार पडली होती. या बैठकीला देशातील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र भारत राष्ट्र समिती (बीआरएस), बिजू जनता दल यासारखे पक्ष मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनतर तेलंगणामधील बीआरएस पक्ष विरोधकांच्या आघाडीचा भाग असेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बीआरएस पक्ष विरोधकांच्या आघाडीचा भाग नसेल, असे जाहीर सभेत सांगितले आहे. ते तेलंगणाच्या दौऱ्यावर असताना खम्मम येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.
बीआरएस पक्ष हा बीजेपी रिश्तेदार समिती- राहुल गांधी
तेलंगणातील खम्मम येथील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी बीआरएस तसेच बीआरएस पक्षाचे नेते के चंद्रशेखर राव यांच्यावर सडकून टीका केली. बीआरएस पक्षाचे खरे नाव ‘बीजेपी रिश्तेदार समिती’ आहे. हा पक्ष भाजपाची बी टीम आहे. तेलंगणाच्या राज्यकारभाराचे रिमोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
कर्नाटकमध्ये जे घडले ते तेलंगणातही घडणार- राहुल गांधी
त्यांनी कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. “काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये एका भ्रष्टाचारी तसेच गरिबांच्या विरोधात असणाऱ्यांविरोधात निवडणूक लढवली. आम्ही तेथील गरीब लोक, ओबीसी, अल्पसंख्याक, अत्याचार झालेल्या लोकांच्या पाठिंब्याने निवडून आलो. तेलंगणामध्येही याचीच पुनरावृत्ती होणार आहे. या निवडणुकीत एका बाजुला राज्यातील श्रीमंत, शक्तीशाली लोक असतील. तर दुसऱ्या बाजूला गरीब, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी, छोटे दुकानदार आमच्यासोबत उभे असतील. कर्नाटकध्ये जे घडले, तेच तेलंगणामध्येही घडणार आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपाचे चारही टायर्स पंक्चर झाले- राहुल गांधी
“या आधी तेलंगणात बीआरएस, भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत होईल असे म्हटले जायचे. मात्र तेलंगणामध्ये भाजपाचे अस्तित्व नाही. भाजपाचे चारही टायर्स पंक्चर झाले आहेत. आता तेलंगणामध्ये काँग्रेस आणि भाजपाची बी टीम यांच्यात लढत आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस पक्ष बीआरएस सोबत जाऊ शकत नाही- राहुल गांधी
राहुल गांधी यांनी बीआरएससोबतच्या आघाडीवरही भाष्य केले. “विरोधकांच्या बैठकीला बीआरएस पक्ष येत असेल तर काँग्रेस पक्ष त्या बैठकीस हजर राहणार नाही. काँग्रेस पक्ष बीआरएस सोबत जाऊ शकत नाही, असे काँग्रेसने विरोधी पक्षांना सांगितले होते,” अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. राहुल गांधी यांच्या या विधानावरून तेलंगणातील आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता धुसर असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते ब्बबर शेर- राहुल गांधी
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा ‘बब्बर शेर’ म्हणून उल्लेख केला. “आम्ही तुमच्या (काँग्रेसचे कार्यकर्ते) मदतीशिवाय बीआरएस पक्षाला पराभूत करू शकत नाही. तुम्ही पक्षाचा कणा आहात. काँग्रेसचे कार्यकर्ते बब्बर शेर आहेत,” असेही राहुल गांधी म्हणाले.