काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काल सोमवारी (१ जुलै) लोकसभेमध्ये पहिल्यांदाच भाषण केले. त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने भाषण केले आणि नव्या लोकसभेची कार्यपद्धतीही आक्रमक असणार असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या या आक्रमक देहबोलीमधून संसदेतील पक्षीय बलाबल आता बदलले असल्याचेही दिसून आले. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज वाढला असून, बहुमताच्या भीतीच्या जोरावर लोकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, हेच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून वारंवार अधोरेखित केले. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर वारंवार तोंडसुख घेतले. जवळपास दीड तास केलेल्या या भाषणामध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान, केंद्र सरकार व भाजपा-आरएसएसच्या कार्यपद्धतीवर इतकी टीका केली की, सत्ताधारी बाकांवर बसलेल्या केंद्रीय मंत्र्यांनीही वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खुद्द नरेंद्र मोदी यांनी एकदा, तर अमित शाह तीन-चारदा उठले आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला. मात्र, त्याचा फारसा परिणाम राहुल गांधींच्या भाषणावर वा त्याच्या परिणामकारकतेवर होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : एकेकाळी दलितांसाठी आशा ठरलेल्या बसपाचा ‘या’ कारणांमुळे जाणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये ही खडाजंगी पाहायला मिळाली. आपल्या भाषणामध्ये राहुल गांधींनी एनडीए सरकारवर जोरदार टीका केली. अग्निपथ योजना, नीट परीक्षेतील गोंधळ, किमान हमीभावाचा मुद्दा, मणिपूरमधील हिंसा आणि अगदी २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरून राहुल गांधींनी प्रचंड मोठा हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या दशकभरात देशामध्ये भय, हिंसा व द्वेष यांचे वातावरण निर्माण केले असल्याचा आरोप करीत त्यांनी जबरदस्त शाब्दिक मारा केला. सरकारच्या या कृष्णकृत्यांमुळे मुस्लीम आणि शिखांबरोबरच अल्पसंख्याक समाजामधील असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याची टीकाही त्यांनी जोरकसपणे केली.

धर्माचा खरा अर्थ

राहुल गांधी यांच्या या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने भाजपा आणि आरएसएसला उद्देशून धर्माचा खरा अर्थ विशद करून सांगितला. त्यासाठी आपल्या भाषणामध्ये पुरेसा वेळ घेतला आणि सर्व धर्मांच्या प्रमुखांची छायाचित्रे दाखवून मांडणी केली. राहुल गांधी यांनी धर्मासंबंधी अशी मांडणी पहिल्यांदाच केली आहे, असे नाही. याआधीही त्यांनी भाजपाचा धर्म विखार वाढविणारा असून, तो खरा हिंदू धर्म नसल्याची मांडणी केली आहे. त्यांनी भाजपाच्या ‘हिंदुत्वा’ला शह देण्यासाठी ‘शांती आणि अहिंसावादी हिंदू’ धर्माचा पुनरुच्चार केला आहे. भाजपा धर्माच्या नावावर देशभर हिंसा आणि भयाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करून “नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नाही, भाजपा म्हणजे हिंदू समाज नाही, आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही,” हे ठामपणे प्रतिपादित केले. राहुल गांधी स्वत:ला शिवभक्त म्हणवून घेतात. काल सोमवारी लोकसभेमध्ये त्यांनी महादेव, गुरू नानक, बुद्ध, महावीर अशा विविध धर्मांतील प्रेषित, धर्मगुरू व महापुरुषांची छायाचित्रे आणि त्यांनी दाखविलेल्या ‘अभय मुद्रेचा’ अर्थ उलगडून सांगितला.

त्यांनी या अभय मुद्रेचा अर्थ याआधी वारंवार दिलेल्या ‘डरो मत’च्या घोषणेशी जोडला. तसेच सर्वच देव, प्रेषित वा धर्मगुरूंनी दाखविलेली ‘अभय मुद्रा’ ही काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाशी मिळती-जुळती असल्याचेही ठामपणे सांगितले. त्यामुळे आम्ही विरोधकच खऱ्या अर्थाने शांतीप्रिय, अहिंसावादी व निर्भय धार्मिक असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. ते हिंदू धर्माचा असा अर्थ विशद करून सांगत असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप नोंदवीत म्हटले, “संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक ठरविणे ही बाब गंभीर आहे.” पंतप्रधानांनी केलेला वार अत्यंत परिणामकारकतेने पलटवत राहुल गांधींनी, “मोदी, भाजप व आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही”, असे ठासून सांगितले. याआधी नरेंद्र मोदी, अमित शाह वा सत्ताधारी पक्षातील कोणत्याही बड्या नेत्याला विरोधकांच्या भाषणावेळी उठून हस्तक्षेप नोंदविण्याचीही कधी गरज भासली नव्हती. मात्र, पहिल्यांदाच सत्ताधारी बाके हतबल दिसून आली. पुढे राहुल गांधींनी अयोध्येतील पराभवावरूनही भाजपावर शेरेबाजी केली. अयोध्येने भाजपाला एक योग्य संदेश दिला असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या बाजूलाच अयोध्येचे (फैजाबाद लोकसभा मतदारसंघ) खासदार अवधेश प्रसाद बसलेले होते. त्यांच्याशी हातमिळवणी करून राहुल गांधी यांनी भाजपाची खिल्लीही उडवली. अवधेश प्रसाद यांनी भाजपाचे लल्लू सिंह यांचा फैजाबाद लोकसभा मतदारसंघात पराभव केला आहे.

हेही वाचा : काँग्रेसचे रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंची हॅटट्रीक

पंतप्रधान मोदींवर कठोर टीका

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात वारंवार पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. तसेच अधेमधे त्यांची खिल्लीही उडवली. पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण बायोलॉजिकल नसल्याचा दावा केला होता. त्यावरून पंतप्रधान मोदींच्या या दाव्याची खिल्ली उडवीत राहुल गांधी म्हणाले की, देशाला थेट ईश्वराशी कनेक्शन असलेले पंतप्रधान लाभले आहेत. आम्ही सगळे मर्त्य मानव आहोत. मात्र, पंतप्रधान स्वत:ला अलौकिक आणि ईश्वराचा अवतार मानतात. “परमात्मा थेट मोदींच्या आत्म्याशी संवाद साधतो; मात्र आम्ही इतर सगळे मानव आहोत”, असे त्यांनी म्हटले. राहुल गांधींनी आणखी एका अशाच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना धारेवर धरले. मोदींनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असा दावा केला होता की, महात्मा गांधींवर चित्रपट आल्यानंतर ते जगाला माहीत झाले. त्याआधी त्यांना फारसे कुणी ओळखत नव्हते. या वक्तव्यावर तोंडसुख घेताना राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही अज्ञानाची पातळी बघू शकता. एका चित्रपटामुळे देशाचा राष्ट्रपिता जगाला समजला, असे मोदींचे म्हणणे आहे.”

पुढे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींचा खुद्द भाजपामधील नेत्यांमध्येच धाक असल्याचा दावा केला. “जेव्हा मी सकाळी आलो तेव्हा राजनाथ सिंह यांनी माझ्याशी स्मितहास्य करून, अभिवादन केले. आता मोदीजी सभागृहात बसले आहेत, तर ते अजिबातच स्मितहास्याने प्रतिसाद देत नाहीत अथवा बघत नाहीत. ते एकदम गंभीर चेहरा करून बसले आहेत. मोदीजी पाहतील या भीतीने ते नमस्तेही करीत नाहीत. हेच नितीन गडकरी यांनाही लागू पडते. अरे, अयोध्येतील जनतेचे सोडा, हे तर स्वत:च्या पक्षातील लोकांनाच घाबरवत आहेत”, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा उठले आणि त्यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले, “लोकशाही आणि संविधानाने शिकविले आहे की, मी विरोधी पक्षनेत्याला गांभीर्याने घेतले पाहिजे.” त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शाह यांनीही राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेवरून केलेल्या दाव्यांबाबत पुरावे मागत आक्षेप नोंदविण्याचा प्रयत्न केला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही हस्तक्षेप करीत सर्वांनी पंतप्रधान मोदींचा आदर केला पाहिजे, असे म्हटले. त्यावर राहुल गांधींनी, “आपण मोदींचा आदर करतोच; फक्त त्यांनी जी काही वक्तव्ये केली आहेत, ती ऐकवून दाखवीत आहोत”, असे म्हटले.

लोकसभा निवडणुकीमध्ये तापलेले राजकीय वातावरण अद्याप थंड झालेले नसल्याचेच यातून दिसून आले. राहुल गांधींच्या भाषणाचा आवेश तसाच आक्रमक होता. त्यांनी महागाई, मणिपूर, बेरोजगारी, नोटबंदी, अग्निपथ व पेपरफुटी यांवरून सरकारला कोंडीत पकडले. ‘अग्निवीरां’कडे सरकार ‘वापरा आणि फेकून द्या’ या दृष्टिकोनातून पाहत असल्याचाही आरोप राहुल गांधीनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi debut as leader of the opposition first speech aggression vsh
First published on: 02-07-2024 at 17:05 IST