काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना २०१९ साली मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या खटल्यात सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयानंतर दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. विशेष म्हणजे खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांचे शासकीय निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मात्र अद्याप काँग्रेसने त्याबाबत हालचाली सुरू केलेल्या नाहीत. यावरच काँग्रेसने भाष्य केले आहे. आम्ही लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >> मेघालय विधानसभेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि टीएमसीचे आपापसातच वाद; विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच
राहुल गांधी यांना कशाचीही चिंता नाही
कोर्टाने दोषी ठरवून पाच दिवस झालेले असूनही काँग्रेसने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलेले नाही. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास विलंब का करत आहे? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात आहे. यावरच जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “भाजपाला हे प्रश्न पडत असतील तर त्याचे उत्तर आम्हाला का विचारले जात आहे? राहुल गांधी यांना कशाचीही चिंता नाही. ते त्यांचे प्रश्न विचारत राहणार. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कायदेशीर टीमबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही भाजपाची खेळी आहे. राहुल गांधी यांची अपात्रता म्हणजे मॅच फिक्सिंगचाच प्रकार आहे. आमच्या कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून या मॅच फिक्सिंगवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे,” असे जयमराम रमेश म्हणाले.
हेही वाचा >> राहुल गांधींच्या अपात्रतेनंतर संपूर्ण देशात काँग्रेस आक्रमक, वायनाडमध्ये मात्र कार्यकर्त्यांत मरगळ
राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा घटनाक्रम समजून घ्यायला हवा. “राहुल गांधी यांनी गौतम अदाणी यांच्याबाबत ७ फेब्रुवारी रोजी संसदेत प्रश्न विचारले. त्यानंतर २७ मार्च रोजी कोर्टाने खटल्यावर सुनावणी घेण्यास सुरुवात केली. १७ मार्च रोजी निकाल राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर २३ मार्च रोजी राहुल गांधी यांना अपात्र ठरविण्यात आले. हे सर्व मॅच फिक्सिंग आहे,” असा आरोप जयराम रमेश यांनी केला.