राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान राहुल गांधींवरील या कारवाईनंतर देशभरातील विरोधक आक्रमक झाले आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविला असून भाजपा तसेच मोदी सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा >>> EVM Machines : शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक; ईव्हीएम मशीनविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवणार
गरज भासलीच तर लोकशाहीला वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. देशाला वाचविण्यासाठी संपूर्ण काँग्रेस तुरुंगात जाण्यास तयार आहे, असे खरगे म्हणाले आहेत. “राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न करण्यात आला. भाजपाला जे सत्य बोलतात त्यांना संसदेत ठेवायचे नाही. मात्र आम्ही मागे हटणार नाही. अदाणी प्रकरणावर संयुक्त संसदीय समिती नियुक्त करण्याची मागणी आम्ही लावून धरू. गरज भासलीच तर लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही तुरुंगातही जाऊ,” असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
असे राजकारण लोकशाहीसाठी घातक – शशी थरूर
काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील ट्वीट करत भाजपा सरकारवर टीका केली आहे. “राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे तसेच ही कारवाई करण्यासाठी राबवण्यात आलेल्या वेगवान प्रक्रियेमुळे मी थक्क झालो आहे. असे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी प्रतिक्रिया शशी थरूर यांनी दिली.
हेही वाचा >>> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे NGO समोर मोठे आव्हान; ‘राष्ट्रीय सेवा भारती’कडून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले जाणार
मोदींच्या नव्या भारतात विरोधक हे मुख्य लक्ष्य- ममता बॅनर्जी
तृणमूल काँग्रेसनेही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. राहुल गांधींच्या निलंबनानंतर तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. “मोदींच्या नव्या भारतात विरोधक हे मुख्य लक्ष्य आहेत, तर गुन्हेगारी इतिहास असलेल्या भाजपाच्या नेत्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जात आहे. विरोधकांनी भाषण केले म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जात आहे,” अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.
एवढे भित्रे पंतप्रधान कधीच पहिलेले नाहीत- अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीदेखील राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवला आहे. “राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. मी आतापर्यंत एवढे भित्रे पंतप्रधान कधीच पहिलेले नाहीत,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
हा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या मृत्यूची औपचारिक घोषणा- मनोज झा
तर आरजेडीचे खासदार मनोज के झा यांनी लोकसभा सचिवालयाचा हा निर्णय लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे, असे मत व्यक्त केले. “हा निर्णय म्हणजे संसदीय लोकशाहीवरील काळा डाग आहे. कोणताही आधार नसलेल्या युक्तिवादावर तसेच कथित तथ्यांवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात जे विधान केले होते, ते सत्य असल्याचे तुम्ही सिद्ध केले आहे. तुम्हाला लोकशाहीचा आदर नाही. देशातील सर्व जनतेने तसेच सर्व पक्षांनी एकत्र येऊन या हुकूमशाही व्यवस्थेला पराभूत करायला हवे. हा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या मृत्यूची औपचारिक घोषणा आहे,” असे मनोज के झा म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> शिक्षेला स्थगिती देऊनही राष्ट्रवादीच्या खासदाराची अपात्रता कायम
ही लोकशाहीची हत्या आहे, सरकारच्या सर्व संस्था सध्या दबावाखाली- उद्धव ठाकरे
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राहुल गांधींवरील अपात्रतेच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. “देशात सध्या चोर म्हणणे गुन्हा झाला आहे. देशातील चोर अजूनही मोकाट आहेत, मात्र राहुल गांधी यांना शिक्षा झाली आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. सरकारच्या सर्व संस्था सध्या दबावाखाली आहेत,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.