तुकाराम झाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंगोली : लाल मातीत मळलेले दोन तगडे मल्ल आणि त्यांच्यात रंगलेल्या कुस्तीतील चितपटाचा डाव पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी येथे घेतला. खासदार गांधी यांची भारत जोडो यात्रा कळमनुरी तालुक्यातील दातीफाटा येथून शनिवारी सकाळी मार्गक्रमण करत निघाली. दुपारी यात्रा आखाडा बाळापूर येथे पोहोचली. येथून जवळच असलेल्या आराटी फाट्यानजीक माजी मंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेचे दर्शन खासदार गांधींना घडवले.

आमदार सतेज पाटील यांनी खासदार गांधींना मराठी मुलुखातील प्रमुख खेळ असलेल्या कुस्तीविषयी आणि त्या खेळाच्या निमित्ताने कोल्हापूरसारख्या कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या भागात तयार हाेणारे मल्ल, त्यांची शड्डूू ठाेकण्यापर्यंत हाेणारी तयारी, आहार-विहार-व्यायामाची व गाव तिथे तालीम, आखाडा आणि अलिकडे रुजत असलेल्या मॅटवरील कुस्तीच्या संस्कृतीविषयीची माहिती दिली. आराटी फाटानजीक कुस्तीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक खासदार गांधींना दाखवण्यात आले. खासदार गांधींच्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विश्‍वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, आमदार प्रज्ञा सातव आदी प्रमुख नेत्यांचा सहभाग होता.

हेही वाचा : त्या दोघांचे चालणे सदृढ लोकशाहीसाठी..; भारत जोडोतील आदित्य ठाकरे यांच्या सहभागानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

यात्रा आखाडा बाळापूरपासून काही अंतरावर आली असतानाच भव्य स्वागत करण्यात आले. ‘नफरत छोडो, भारत जोडो, वो तोडेंगे हम जोडेंगे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या ठिकाणावरून माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील व त्यांचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. डोक्याला फेटे बांधून सहभागी झालेले कार्यकर्ते यात्रेत चर्चेचा विषय बनले होते. सिंचन वसाहतीजवळ माजीमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत केले. सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरकरांनी तेथील संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी विविध खेळांचे प्रदर्शन घडविले. तसेच कुस्तीत रंगलेल्या फडातील चितपटाचा डावही दाखविण्यात आला. खासदार गांधी यांनी कुस्तीपटू मल्लांचे कौतुक केले. त्यानंतर यात्रा कळमनुरीकडे मार्गस्थ झाली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi enjoyed watching the wrestling match ex minister satej patil in balapur hingoli print politics news tmb 01