देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ सप्टेंबर रोजी या परिषदेचा पहिलाच दिवस होता. या परिषदेतील स्नेहभोजन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित न केल्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. सध्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे युरोप दौऱ्यावर आहेत. त्यांनी युरोपमधून मोदी सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका केली आहे. महागाई, देशातील वेगवेगळ्या संस्थांची स्वायत्तता यावर त्यांनी भाष्य केले. तसेच आमच्या देशातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रिटन दौऱ्यावर असताना मोदी यांच्यावर केली होती टीका

सध्या भारतात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे. भारतातील लोकशाही धोक्यात आहे, असा दावा राहुल गांधी सतत करतात. परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी ही भूमिका सातत्याने घेतलेली आहे. काही महिन्यांपूर्वी ते ब्रिटन दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. भारतातील लोकशाही कमकुवत झाल्यास संपूर्ण जगातील लोकशाही कमकुवत होईल, असे ते म्हणाले होते. त्यांच्या याच विधानानंतर भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. विदेशात जाऊन भारताची बदनामी केल्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी तेव्हा भाजपाने केली होती.

… ती आमचीच जबाबदारी : राहुल गांधी

भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये परदेशी लोकांनी हस्तक्षेप करावा, अशी राहुल गांधी भूमिका यांची आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येईल, असा आरोप तेव्हा भाजपाकडून करण्यात आला होता. सध्या राहुल गांधी हे युरोपच्या दौऱ्यावर आहेत. यावेळीही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. मात्र, यावेळी त्यांनी हे आमचे देशांतर्गत प्रश्न आहेत. आम्ही या प्रश्नांविरोधात लढण्यास समर्थ आहोत, असेही स्पष्ट केले. “आमच्या देशातील संविधानिक हक्क तसेच लोकशाही कायम राहावी यासाठीची लढाई ही आमची स्वत:ची आहे. ती आमचीच जबाबदारी आहे. त्याची आम्ही काळजी घेऊ. तसेच आमच्या देशातील वेगवेगळ्या संस्था आणि आमचे स्वातंत्र्य यावर होणारा हल्ला कसा थांबेल, यासाठी योग्य ती खबरदारी घेऊ,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

ते विरोधी पक्षाला महत्त्व देत नाहीत : राहुल गांधी

दिल्लीतील जी-२० परिषदेला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना भोजनाचे आमंत्रण देण्यात आले नाही. हाच मुद्दा घेऊन काँग्रेसकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. याच मुद्द्यावर राहुल गांधी यांनीदेखील भाष्य केले. “देशातील ६० टक्के जनतेचे प्रतिनिधित्व हे विरोधक करतात. त्यांनी खरगे यांना भोजनासाठी आमंत्रण दिले नाही, यातून हेच स्पष्ट होते की, या ६० टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना ते महत्त्व देत नाहीत. त्यांना असे करण्याची गरज का भासत आहे? यामागे कोणता विचार आहे? यावर विचार केला पाहिजे,” असे राहुल गांधी म्हणाले.

देशात दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांवर अत्याचार : राहुल गांधी

रशिया-युक्रेन युद्धावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी या युद्धावरील भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. “युक्रेन-रशिया युद्धावर भारताने जी भूमिका घेतली आहे, त्यावर विरोधक सहमत आहेत. आपले रशिया या देशाशी चांगले संबंध आहेत. या बाबतीत विद्यमान सरकारची जी भूमिका आहे, विरोधकांची त्यापेक्षा वेगळी भूमिका नसावी,” असे राहुल गांधी म्हणाले. पुढे राहुल गांधी यांनी, भारतात दलित, अल्पसंख्याक, आदिवासी समाजाच्या लोकांवर अत्याचार होत आहेत. त्यांना भेदभावाला सामोरे जावे लागत आहे, असा दावाही केला.

देशाचे नाव बदलण्यावर भाष्य

विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया असे आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून ठिकठिकाणी इंडिया या नावाचा उल्लेख टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी भाष्य केले. “आपल्या संविधानात ‘इंडिया म्हणजेच भारत’ असा उल्लेख आहे. संविधानात असलेल्या या उल्लेखाविषयी मी समाधानी आहे. आमच्या आघाडीच्या नावामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सध्या लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या आघाडीचे नाव इंडिया, असे आहे. ही खूपच चांगली कल्पना आहे. आम्ही स्वत:ला देशाचा आवाज समजतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिंता वाढली आहे. याच कारणामुळे मोदींना देशाचे नाव बदलायचे आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi europe tour criticizes narendra modi over g20 summit india name changing issue prd