नॅशनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने पाच दिवस, एकुण पन्नास तास राहुल गांधी यांची चौकशी केली. या चौकशीनंतर प्रथमच काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की “अधिकारी थकवू शकत नाहीत. अधिकारी येत-जात असतात. माझी चौकशी सुरू ठेवण्यासाठी कदाचित त्यांना वरिष्ठांकडून सूचना मिळत होत्या. पण सतत ११ तास चौकशीला सामोरे जाऊनसुद्धा मी थकलो नाही. मग अधिकाऱ्यांनीच मला सांगितले की ते थकले आहेत आणि मलाच न थकण्याचे रहस्य काय आहे असे विचारले. मला वाटले की मी त्यांना खरे कारण सांगणार नाही. पण मी त्यांना सांगितले की मी विपश्यनेचा सराव करतो आणि तो सराव करताना ६ ते ८ तास बसावे लागते, त्यामुळे मला याची सवय झाली आहे”. राहुल गांधी हे विपश्यनेवर विश्वास ठेवणारे आहेत. विपश्यना करणारे राहुल गांधी हे काही एकटे नाहीत. अनेक राजकीय नेते विपश्यना करतात.राहुल यांच्या व्यतिरिक्त, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेसुद्धा बरेच वेळा विपश्यना सत्रासाठी ब्रेक घेतात आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील विपश्यनेचे महत्व पटवून सांगतात.
२०१४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृवाखाली काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीत झालेल्या अपमानास्पद पराभवानंतर राहुल गांधी ५७ दिवस विपश्यना केंद्रावर जाऊन राहिले होते. त्यावेळी याबाबत प्रचंड गुप्तता पाळली गेली होती. यापूर्वी, एप्रिल २०१३ मध्ये, राहुल यांनी मोहनखेडा येथील विपश्यना आश्रमात युवक काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन आयोजित केले होते.
२०१७ मध्ये भाजप खासदार पूनम महाजन, इंडिया टुडे ग्रुपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या की, “विपश्यना करणार्यांचे मन गडबडलेले आहे. पुनम महाजन यांनी राहुल गांधी यांना जाहीर टोला लगावल्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांना याबाबत प्रत्युत्तर देण्यात आले होते. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला हे पूनम महाजन यांना उत्तर देताना म्हणाले होते की “जो कोणी आध्यात्मिक आहे तो गोंधळलेला नाही, त्याऐवजी जो कोणी त्याला असे म्हणतो तोच गोंधळलेला आहे”.
२०१८ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडाला भेट देऊन ध्यान तंत्राच्या फायद्यांचे कौतुक केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की “विपश्यना हे एक ध्यान तंत्र आहे जे भगवान बुद्धांनी शिकवले होते. यात तीन सोप्या नियमांचा समावेश होतो – नैतिकता, आत्म-साक्षात्कार आणि मनाची एकाग्रता. हे नियम जात, धर्म, भाषा आणि लिंग यांचा विचार न करता सर्वांना समान रीतीने लागू होतात.