नवी दिल्ली : महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रीय निवड समितीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केल्याचे समजते. राज्यात काँग्रेसच्या वाट्याला ओबीसी प्रभाव असलेल्या किती जागा मिळाल्या आहेत, काँग्रेस पक्षाने ओबीसींना किती प्रतिनिधित्व दिले आहे, असा प्रश्नांचा भडिमार राहुल गांधींनी केला. काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केलेल्या नाहीत, असे मतही राहुल गांधींनी बैठकीत बोलून दाखवले. राहुल गांधींच्या नाराजीच्या मुद्द्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दुजोरा दिला.

राज्यातील २८८ जागांपैकी काँग्रेस १०३-१०५ जागा लढवण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसला मुंबई व विदर्भामधील काही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आग्रही भूमिकेमुळे सोडून द्याव्या लागल्या आहेत. ओबीसी, दलित व मुस्लिम मतांचे गणित लक्षात घेऊन काँग्रेसला या दोन्ही विभागांत अधिक जागा मिळण्याची अपेक्षा होती.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024: याद्यांच्या प्रतीक्षा कायम! ‘मविआ’त मतभेद उघड; महायुतीतही जागावाटपावर मौन

मात्र, महाविकास आघाडी टिकावण्यासाठी काँग्रेसला काही जागांवर पाणी सोडावे लागत असल्याने राहुल गांधी नाराज झाल्याचे सांगितले जाते. राहुल गांधींनी बोलून दाखवलेले मत योग्य आहे. काँग्रेसला सामाजिक समीकरण तसेच, जागा जिंकण्याची क्षमता या दोन्ही निकषांवर (मेरिटवर) मुंबई, विदर्भासह अन्य विभागांमध्येही जास्त जागा मिळायला हव्या होत्या.

पण, आघाडीतील मित्र पक्षांशी वाटाघाटी करून जागावाटप करावे लागले, त्यांनी काही जागांबाबत घोळ घातल्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत, असे आम्ही राहुल गांधींना सांगितल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राज्यामध्ये ‘सोशल इंजीनिअरिंग’ला राहुल गांधींनी अधिक महत्त्व दिले आहे. सत्तेमध्ये विविध समाजघटकांना समावून घेतले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. म्हणूनच मतदारसंघनिहाय प्रभाव बघून ओबीसींना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.