काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीर राज्यात आहे. ‘भारत जोडो’ यात्रा शेवटच्या टप्प्यात प्रवास करत आहे. अशातच राहुल गांधींनी एका यूट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे. यामध्ये राहुल गांधींना खाण्यास काय आवडतं? नोकरी केली का? लग्न कधी करणार? पंतप्रधान झाल्यास काय करणार? अशा प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.
राहुल गांधींनी कामिया जानी या फूड युट्यूबरशी संवाद साधला आहे. याचा व्हिडीओ काँग्रेसने आपल्या समाज माध्यमांवर प्रदर्शित केला आहे. यामध्ये राहुल गांधींनी कामिया जानी यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. तसेच, राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर दौऱ्यात चर्चेत राहिलं ते त्यांचा टी-शर्ट आणि वाढलेली दाढी. पण, ही कापण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर खूप दबाव टाकण्यात येत आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.
हेही वाचा : “…तर भाजपाचा सर्वच जागांवर पराभव होऊ शकतो,” लोकसभा निवडणुकीवर बोलताना अखिलेश यादव यांचे मोठे विधान!
लग्न कधी करणार?
“माझा लग्नास विरोध नाही. चांगली मुलगी मिळाली की लग्न करणार आहे. पण, एकच अट आहे, की मुलगी हुशार पाहिजे. माझ्या आई-वडिलांचं लग्न सुंदर झालं होतं,” असं राहुल गांधींनी सांगितलं.
खाण्यास काय आवडतं? आवडती रेस्टॉरंट्स कोणती?
राहुल गांधी म्हणाले, “घरी असेल तर फणस आणि वाटाण्याची भाजी खाणं टाळतो. तर, मांसाहारीमध्ये चिकन टिक्का, सीख कबाब, ऑम्लेट खाणे आवडतं. दररोज सकाळी कॉफी पितो. बाहेर खाण्यास जायचं असल्यास जुन्या दिल्लीत जातो. तसेच, मोती महल, सागर, स्वागत सर्वाना भवन ही आवडती रेस्टॉरंट्स आहेत.”
पंतप्रधान झाल्यावर काय करणार?
“पंतप्रधान झालो तर शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवणार. उद्योगांना मदत करणार. तसेच शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसह अडचणीत सापडलेल्या जनतेच्या पाठीशी उभे राहणार,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
हेही वाचा : मेघालय निवडणुकीसाठी भाजपा राबवणार ‘हा’ पॅटर्न; काँग्रेससाठी ठरणार मोठे आव्हान
नोकरी केली होती का?
राहुल गांधींनी लंडनमध्ये मॉनिटर कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी केल्याचं सांगितलं आहे. “तेव्हा मला मी २५ वर्षांचा होतो. तर, पहिला पगार ३ हजार पौंड होता. हे पैसे खोलीच्या भाड्यासाठी जात होते,” असं राहुल गांधी म्हणाले.