राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रायबरेली आणि वायनाड अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना या दोन्ही मतदारसंघात विजय प्राप्त झाला आहे. काल सोमवारी (१७ जून) काँग्रेस पक्षाने अशी घोषणा केली आहे की, राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघ राखतील, तर केरळमधील वायनाड मतदारसंघ सोडून देतील. या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढवतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रियांका गांधी आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील लोकांना उद्देशून म्हटले की, “तुम्हाला आता दोन खासदार मिळणार आहेत. मी वरचेवर येत राहीन. वायनाडमधील लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांनीच मला खडतर काळात लढण्याची उर्जा दिली”, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “राहुलची अनुपस्थिती मी वायनाडकरांना भासू देणार नाही. वायनाडमधील लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आणि एक चांगली लोकप्रतिनिधी होण्यासाठी मी कष्ट घेईन.” या पोटनिवडणुकीमध्ये जर प्रियांका गांधी यांचा विजय झाला तर नेहरु-गांधी घराण्यातील तीन सदस्य एकाच वेळी संसदेत असण्याची ती पहिलीच वेळ ठरेल. तसेही वायनाड हा प्रियांका गांधी यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ मानला जात आहे. काँग्रेसवर याआधीही घराणेशाहीचा आरोप वारंवार झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधक या मुद्द्याचे राजकारण करतील हे निश्चित. सध्या सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा