महेश सरलष्कर
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची रविवारी भर पावसात झालेली जाहीरसभा हा ‘निर्णायक क्षण’ असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जाऊ लागला आहे! वास्तविक, काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून घातलेल्या प्रचंड घोळात राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ झाकोळून गेली होती. आता पुन्हा यात्रेकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून होऊ लागले आहेत.सध्या काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कर्नाटकमध्ये असून म्हैसूरमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या जाहीरसभेत मुसळधार पाऊस सुरू असतानाही राहुल गांधी यांनी भाषण केले. ‘कन्याकुमारीहून निघालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणारच. या यात्रेला कोणीही रोखू शकत नाही, अगदी पाऊस सुद्धा नाही. बघा इथे पाऊस पडतो आहे, पण, आपल्या यात्रेत खंड पडलेला नाही’, असे राहुल गांधी म्हणाले.
‘राहुल गांधी यांचे भरपावसातील भाषण काँग्रेस पक्षासाठी निर्णायक क्षण होता. पावसातही प्रचंड गर्दी होती, पाऊस पडला म्हणून कोणीही उठून निघून गेले नाही’, असा मुद्दा काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी मांडला. तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी पावसात सभा घेऊन राज्यातील वातावरणात कमालीचा बदल घडवून आणला होता. या घटनेचा जयराम रमेश यांनी उल्लेख केला नसला तरी, पवारांच्या सभेने केलेली कमाल राहुल गांधींच्या पावसातील सभेने घडू शकते, असे रमेश यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राजकीय शक्तीची पहिली चाचणी
राहुल गांधींची म्हैसूरमधील ही सभा लोकांसाठी लक्षवेधी बाब ठरली आहे, आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी देखील ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. त्यासाठी त्या सोमवारी म्हैसूरला पोहोचल्या. सोनियांचा सहभाग आणि कदाचित त्यांची होणारी जाहीर सभा ‘भारत जोडो’ यात्रेला भाजपशासित कर्नाटक राज्यामध्ये अधिक यशस्वी करू शकेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. ४ व ५ ऑक्टोबर हे विश्रांतीचे असून या दोन दिवसांमध्ये यात्रेच्या आगामी टप्प्याची आखणी केली जाईल. २३ सप्टेंबर रोजीही यात्रेचा विश्रांतीचा दिवस होता पण, राहुल गांधी यांनी दिल्लीला न येता संपूर्ण दिवस कंटेनरमध्ये काढला होता. त्यामुळे मायदेशी परतल्यानंतर सोनियांची त्यांची भेट झाली नव्हती. आता मात्र, दोघांचीही या दोन दिवसांमध्ये भेट होऊ शकेल. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया व राहुल पहिल्यांदाच एकत्रितपणे सहभागी होणार आहेत.
हेही वाचा : राज ठाकरे यांनी नागपूर कार्यकारिणी बरखास्त करून काय साध्य केले?
यात्रेसाठी ॲप
आत्तापर्यंत ‘भारत जोडो’ यात्रेने तामिळनाडूमध्ये ६२ किमी, केरळमध्ये ३५५ किमी व तीन दिवसांमध्ये कर्नाटकमध्ये ६६ किमीचा पल्ला गाठला आहे. अजून १८ दिवस ही यात्रा कर्नाटकमध्ये असेल. तिथून ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तिथून महाराष्ट्रात प्रवेश करेल. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रेचा ॲप विकसीत केले असून यात्रा आपल्या रहिवासी भागांत असल्याची माहिती त्यावर मिळू शकेल. यात्रेत सहभागी होऊन एक-दोन किमी अंतर चालताही येईल. यात्रेत सहभागी झाल्याचे प्रशस्तीपत्रकही काँग्रेसकडून दिले जाईल. लोकांना प्रश्न विचारता येतील, सूचना करता येतील, अगदी टीकाही करता येईल, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली.