काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती आपला सहभाग नोंदवत आहेत. दरम्यान, एकीकडे भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू असताना दुसरीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. विरोधकांनी एकत्र येत भाजपासाठी एक सक्षम पर्याय उभा करणे गरजेचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> “केंद्र सरकार लष्कराच्या मागे लपत…”, चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचं टीकास्त्र; म्हणाले…
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, बसपाच्या अध्यक्षा मायावती तसेच राष्ट्रीय लोक दल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राहुल गांधी यांना शनिवारी (३१ डिसेंबर २०२२) पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “या यात्रेत कोण सहभागी होतंय आणि कोण होणार नाही, यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. मात्र प्रत्येकासाठी भारत जोडो यात्रेचा दरवाजा खुला असेल, असे मला सांगायचे आहे. प्रेम आणि द्वेष यामध्ये समानता असू शकत नाही. अखिलेश, मायावती असे अनेक नेते आहेत ज्यांना प्रेम असलेला भारत हवा आहे. द्वेषाने भरलेला भारत त्यांना नको आहे. त्यामुळे आमचे त्यांच्यासोबत एक खास नाते आहे. हे नाते वैचारिक आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा >>> ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी बसपा राबवणार खास मोहीम, मायावतींनी कार्यकर्त्यांना दिला महत्त्वाचा आदेश!
२०२४ साली होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केले. “एक निश्चित दृष्टीकोन ठेवून विरोधी पक्ष उभे राहिले तर भाजपाला जिंकणे खूप कठीण होईल. मात्र त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये उत्तम समन्वय असणे गरजेचे आहे. तसेच विरोधी पक्षाने जनतेला एक सक्षम पर्याय द्यायला हवा,” असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.