Rahul Gandhi Announce White T-Shirt Movement: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत असताना युवक आणि सामान्यांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी “व्हाइट टी-शर्ट मूव्हमेंट” सुरू केली आहे. काँग्रेसच्या घटनेत त्यांच्या सदस्यांसाठी नऊ अटी दिलेल्या आहेत. त्यापैकी दुसऱ्या क्रमाकांची अट आहे की, तो किंवा ती यांनी खादीचा वापर करायला हवा. १९३४ रोजी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसने घटनेत बदल करत ही अट घातली होती. या घटनेला आता ९० वर्ष पूर्ण होत असताना राहुल गांधी यांनी खादीच्या पुढे जात व्हाइट टी-शर्टवर भर दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान व्हाइट टी-शर्ट आणि खाकी ट्राऊजरचा वापर सुरू केला. भारत जोडो यात्रा दिल्ली आणि उत्तर भारतात पोहोचली असताना कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी फक्त या पांढऱ्या टी-शर्टवर दिसून आले. आता राहुल गांधी यांनी “सर्वांसाठी न्याय आणि भविष्याच्या समान विकासासाठी” व्हाइट टी-शर्ट मूव्हमेंटची घोषणा रविवारी केली.

काँग्रेसमधील एका नेत्याच्या मतानुसार, गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक जण व्हाइट टी-शर्टशी जोडला जाऊ शकतो. महात्मा गांधी यांनी जेव्हा स्वराज्याविषयी बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी चरखा, खादी आणि टोपी यांचा प्रतीकाप्रमाणे वापर केला. आम्हालाही राहुल गांधींच्या ‘न्याय’प्रिय राजकारणासाठी एका चिन्हाची गरज आहे, त्यामुळे पांढरा रंग निवडला जो शांती आणि सौहार्दाचे प्रतीक आहे.

व्हाइट टी-शर्ट मूव्हमेंटसाठी एक संकेतस्थळही बनविले गेले आहे. संकेतस्थळावरील संदेशात म्हटले आहे की, “व्हाइट टी-शर्ट एका आंदोलनाच्या आरंभाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. युवांसाठी हा एक मंच असून यात विविध क्षेत्रातील श्रमिकांना एकत्र केले आहे. या श्रमिकांच्या श्रमामुळेच आपल्या जीवनाला आकार मिळतो. जर तुम्हीही आर्थिक असमानता आणि आर्थिक निरपेक्षतेची मागणी करत असाल, धार्मिक भेदभावाला झिडकारत असाल, शांती आणि स्थिरतेला महत्त्व देत असाल तर तुम्हीही पांढरा टी-शर्ट घाला आणि परिवर्तनासाठी आमच्याशी जोडले जा.”

आणखी एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की, अभियानासाठी प्रतीक म्हणून काय निश्चित करायचे, याचे अनेक पर्याय आमच्यासमोर होते. पण आम्हाला वाटले की, व्हाइट टी-शर्ट हा सर्वात चांगला पर्याय आहे. हा सामान्य माणसाचा पेहराव असून राहुल गांधी यांच्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळत आहे.

व्हाइट टी-शर्ट चळवळीचा पहिला भाग म्हणून गिग कामगारांना एकत्र केले जाणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा बनविण्याचा शब्द राहुल गांधी यांनी दिला आहे. राजधानी दिल्लीत सुमारे १५ लाख गिग कामगार आहेत. काँग्रेसच्या अंदाजानुसार छोट्या आणि मोठ्या शहरात यापेक्षा अधिक गिग कामगार असू शकतात. काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गिग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्क आणि संवर्धनासाठी कायदा आणणार असल्याचे आश्वासन दिले होते.

राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्ट करत सदर चळवळीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मोदी सरकारने गरीब आणि श्रमिक वर्गापासून तोंड फिरवले आहे. त्यांना हालअपेष्टा सहन करण्यासाठी सोडले आहे. सरकारचे लक्ष फक्त काही निवडक भांडवलदारांवर आहे. त्यांचीच समृद्धी करण्यात सरकार व्यस्त आहे. यामुळेच देशात असमानता वाढत चालली असून घाम गाळणाऱ्या श्रमिकांची स्थिती बिघडत चालली आहे. ते विविध अत्याचाराचा सामना करत आहेत, त्यामुळेच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, श्रमिकांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून देण्यासाठी एकत्र आवाज उठवायला हवा. व्हाइट टी-शर्ट मूव्हमेंटपासून आपण याची सुरुवात करत आहोत.”

राहुल गांधी यांनी पुढे युवा आणि श्रमिक वर्गाला आवाहन केले की, त्यांनी या चळवळीत सामील व्हावे.

व्हाइट टी-शर्ट चळवळीत “काम के बंदे” या नावाने स्वयंसेवक नोंदणीचा पर्याय दिला आहे. पक्षाच्या मतानुसार हा पहिला असा प्रयत्न आहे, ज्यामध्ये तरुणांना शहर आणि निमशहरातील कामगारांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांना एकत्र करण्याची संधी दिली जाणार आहे. या संधीद्वारे तरुणांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येता येणार आहे. या कामासाठी स्वयंसेवकांना कोणतेही मानधन मिळणार नाही.

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, व्हाइट टी-शर्ट हे प्रतीक म्हणून वापरत असताना याची प्रेरणा सिंगापूरच्या व्हाइट शर्ट चळवळ आणि फ्रान्सच्या ‘यलो व्हेस्ट्स’ आंदोलनापासून घेतली गेली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi launch white t shirt movement against narendra modi government kvg