काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकार मणिपूरसह देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण संपल्यानंतर कथितरित्या फ्लाइंग किस दिल्याचाही आरोप केला जात आहे. असे असतानाच राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग संसदेच्या नोंदीतून हटवण्यात आला आहे. हाच मुद्दा घेऊन काँग्रेसने मोदी सरकावर गंभीर टीका केली. राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग हटवणे हे अन्यायकारक आहे. हा संसदेचा अवमान आहे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
काँग्रेस सभागृहात मुद्दा उपस्थित करणार
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबद्दल पक्षाची भूमिका मांडली. राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग हटवण्यात आल्यामुळे मी लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेणार आहे. तसेच हटवण्यात आलेल्या भाषणाची संसदेच्या रेकॉर्डमध्ये पुन्हा एकदा नोंद करावी, अशी मागणी मी करणार आहे. हाच मुद्दा आम्ही गुरुवारी सभागृहातही उपस्थित करणार आहेत, अशी माहिती अधीर रंजन चौधरी यांनी दिली.
भाषणातील भाग वगळणे अन्यायकारक
राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग वगळणे हे फार अन्यायकारक आहे. संध्या संसद ही एकमेव संस्था अशी आहे, ज्याचे अधिकार शाबूत आहेत. मात्र या एकमेव व्यवस्थेलाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही चौधरी यांनी केला.
विरोधक बोलताना लोकसभा अध्यक्षांचाच चेहरा दाखवला जातो
संसदेत विरोधकांची गळचेपी केली जात आहे. जेव्हा संसदेत भाजपाचा खासदार भाषण करायला उभा राहतो, तेव्हा केंद्र सरकारच्या संसद टीव्ही या वाहिनीवर त्यांचे चेहरे दाखवले जातात. मात्र जेव्हा आम्ही भाषणासाठी उभे राहतो, तेव्हा टीव्हीवर लोकसभा अध्यक्षांना दाखवले जाते. आमच्या भाषणादरम्यान टीव्हीवर ४० टक्के लोकसभा अध्यक्षच दिसतात, असा गंभीर आरोप चौधरी यांनी केला. तसेच मी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. सध्या सत्ताधाऱ्यांकडून अन्याय केला जात आहे. सत्ताधारी संसदेचा अवमान करत आहेत, असेही चौधरी म्हणाले.
फेब्रुवारी महिन्यातही भाषणातील काही भाग हटवला होता
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातही राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरून चांगलाच वाद झाला होता. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उद्योगपती गौतम अडाणी यांच्यात सख्य आहे. गौतम अडाणी यांना पुरक असलेले निर्णय मोदी सरकारकडून घेतले जातात, असा आरोप केला होता. मात्र या भाषणातील एकूण १८ टिप्पण्या संसदेच्या नोंदणीतून हटवण्यात आल्या होत्या. राहुल गांधी यांनी तेव्हा ५३ मिनिटे भाषण केले होते.