Bihar Politics : बिहार विधानसभेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरु केली आहे. एकीकडे एनडीए तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तसेच बिहारमधील स्थानिक पक्षाच्या नेत्यांकडूनही मोठी रणनीती आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी देखील मोठी तयारी सुरु केली आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनाइटेड) पक्षानेही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी तयारी सुरु केली आहे. याचबरोबर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसही मैदानात उतरले आहेत.
आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटणा येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यामुळे आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि आरजेडी पक्षातील संबंध ताणले गेले होते. कारण लालू प्रसाद यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्व करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. त्यामुळे काँग्रेस आणि आरजेडी पक्षातील संबंध ताणले गेल्याचं बोललं जात होतं.
आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर २०२५ या दरम्यान बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्याबरोबर दोन्ही पक्षात जागावाटपासाठी चर्चा केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांची पाटणा येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. काँग्रेसची महत्वाची बैठक सुरु होती, त्याच हॉटेलमध्ये योगायोगाने ‘राजद’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडत होती. या हॉटेलमध्ये राहुलगांधी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांची भेट घेत त्यांना त्याच्या आई-वडिलांच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. ते निमंत्रण स्वीकारून राहुल यांनी लालू यांदव यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी आरजेडी प्रमुख नेत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
या भेटीसंदर्भात आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “ही अनौपचारिक बैठक असली तरी दोन्ही बाजूंनी राजकीय चर्चा झाली. आमचे राजकीय प्रतिस्पर्धीच्या विरोधात निवडणूक कशी लढवली पाहिजे? याबाबत काहीसी चर्चा झाली. आरजेडी आणि काँग्रेस हे जुने मित्र आहेत आणि दोन्ही पक्षांची स्वतःची धोरणे एक आहेत. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते ज्ञान रंजन गुप्ता यांनी म्हटलं की, “राहुल गांधी आणि लालू यादव याआधीही एकमेकांना भेटत आले आहेत. सध्याच्या बैठकीतही उत्साही आणि सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, पाटणा येथील राज्य पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस नेत्याच्या भेटीचा संदर्भ देताना रंजन गुप्ता यांनी म्हणाले, “राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी आम्हाला आरएसएस आणि भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी कामाला लागण्याचे सांगितले. तसेच राहुल गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) विद्यार्थ्यांशी बोलण्याचं आवाहनही केलं.