Rahul Gandhi Protest Against Modi and Shah in Parliament : काँग्रेस खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल (सोमवार, ९ डिसेंबर) संसद भवनाच्या आवारात केलेल्या एका अनोख्या आंदोलनाची बरीच चर्चा झाली. राहुल गांधी व काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदाणी यांच्याविरोधात आंदोलन केलं. मोदी-अदाणींचे फोटो असलेले पोस्टर हातात घेऊन त्यांचा निषेध नोंदवला. दोघांमधील कथित हितसंबंधांमुळे देशाचं नुकसान होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला. त्यानंतर राहुल गांधी दोन खासदारांबरोबर प्रसारमाध्यमांसमोर आले. या दोन्ही खासदारांनी चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदाणींचे मुखवटे लावले होते. या खासदारांना बरोबर घेत राहुल गांधी यांनी मोदी व अदाणींमधील कथित हितसंबंधांविरोधात अनोखं आंदोलन केलं. तसेच राहुल यांनी यांनी या दोघांची मुलाखतही घेतली. या आंदोलनाची दिवसभर चर्चा झाली. हे दोन खासदार कोण होते? असा प्रश्न देखील अनेकांना पडला होता. तमिळनाडूच्या विरुधूनगरचे खासदार मनिकम टागोर व महाराष्ट्रातील लातूर मतदारसंघातील खासदार शिवाजीराव काळगे हे दोन खासदार मोदी-अदाणींचे मुखवटे घालून आले होते. या दोघांनी सर्व प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं.
संसदेचं अधिवेशन वारंवार तहकूब केल्यामुळे राहुल गांधी यांना मोदी-अदाणींचा मुद्दा संसदेत मांडण्याची संधी मिळाली नाही. परिणामी राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले व त्यांनी या अनोख्या आंदोलनाचा मार्ग निवडला. राहुल गांधी यांनी मोदी-अदाणींचे मुखवटे घातलेल्या टागोर व काळगे यांना काही प्रश्न विचारले. राहुल गांधींनी त्यांना विचारलं, “तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल बोला”. त्यावर ते म्हणाले, “आम्ही दोघे मिळूनच सगळं करतो. २० वर्षांपासून आमची मैत्री आहे”. त्यावर राहुल गांधींनी त्यांना विचारलं की “तुम्ही संसदेचं अधिवेशन का चालू देत नाही, कामकाज वारंवार तहकूब का करता?. त्यावर ते दोघे म्हणाले, “आज अमित (केंद्रीय गृहमंत्री अमित शाह) आलेला नाही. तो आल्यावर सांगतो”.
राहुल गांधींचं संसदेच्या आवारात अनोखं आंदोलन
अदाणींचा मुखवटा परिधान केलेले खासदार टागोर म्हणाले, “मी जे काही सांगतो ते हा (मोदी) सगळं करतो. मला वाटेल ते सगळं मी याला सांगतो आणि मग तो ते काम करतो. मला बंदरं हवी असतील तर ती देतो, विमानतळं देतो”. राहुल गांधींनी त्या दोघांना विचारलं की “आता तुम्ही काय बळकावणार आहात?” त्यावर ते म्हणाले, “आमची संध्याकाळी बैठक आहे. त्या बैठकीत अमितभाईसुद्धा आहे. तिथे सगळं ठरेल”. मोदींच्या मुखवट्याकडे बोट करत राहुल गांधी म्हणाले, “हे इतके चिंतेत का आहेत?” त्यावर त्याचा दुसरा साथीदार (अदाणी) म्हणाला, “तो थोडा गंभीर आहे, त्याला फार बोलायची सवय नाही”.
प्रियांका गांधींच्या पर्सने वेधलं लक्ष
यासह काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारात काही पोस्टर झळकावले. ‘मोदी-अदाणी एक आहेत’ असं त्या पोस्टरवर लिहिलं होतं. तशाच पद्धतीच्या घोषणा देखील दिल्या गेल्या. “मोदी-अडाणी एक हैं- मोदी हैं तो अडाणी सेफ हैं” (मोदी अदाणी एक आहेत- मोदींमुळे अदाणी सुरक्षित आहेत) अशा घोषणा दिल्या गेल्या. अनेकांच्या कपड्यांवर या घोषणा लिहिलेले स्टिकर पाहायला मिळाले. आज, संसदेत आलेल्या खासदार प्रियांका गांधींच्या पर्सवर मोदी-अदाणींचा फोटो पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ हैं अशी घोषणा दिली होती. त्याच घोषणेवरून मोदी है तो अदाणी हैं अशा घोषणा काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारात दिल्या.
हे ही वाचा >> विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
“…म्हणून काँग्रेसने आंदोलनाचा हा मार्ग निवडला”
शुक्रवारी काँग्रेस खासदारांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन व चेहऱ्यावर मोदी-अदाणींचे मुखवटे लावून घोषणा दिल्या. मोदी-अदाणी भाई भाई अशा घोषणा दिल्या. या आंदोलनाबद्दल विचारल्यानंतर काँग्रेस खासदार म्हणाले, प्रसारमाध्यमं मोदी-अदाणींच्या संबंधांबद्दल काही बोलत नाहीत. त्यावर प्रकाश टाकत नाहीत. त्यामुळे हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यसाठी आम्ही हे आगळंवेगळं आंदोलन करत आहोत.
हे ही वाचा >> मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
काँग्रेस खासदारांकडून टागोर-काळगेंचं कौतुक
काल काँग्रेस खासदारांनी मोदी-अदाणींचे मुखवटे परिधान करून केलेल्या आंदोलनाबद्दल विचारल्यावर काँग्रेस सदस्यांनी सांगितलं की मोदी-अदाणींच्या संबंधांकडे लक्ष वेधण्यासाठी ते आंदोलन केलं होतं. तसेच राहुल गांधी यांनी त्यांची मुलाखत घेतली नाही. त्यांनी केवळ दोन तीन मिनिटात काही प्रश्न विचारले. त्या दोन्ही खासदारांना माहिती नव्हतं की राहुल गांधी त्यांना प्रश्न विचारणार आहेत. ते दोघे तशा प्रश्नांसाठी तयार नव्हते. तरीदेखील ते राहुल गांधींबरोबर बाहेर गेले, प्रसारमाध्यमांना समोरे गेले. परंतु, राहुल गांधींनी अचानक मोदी-अदाणी म्हनून त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या दोघांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली ते कौतुकास्पद होतं.