२०१६ मध्ये भारताने पाकिस्तानातील उरी येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, अशी असं विधान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केले होते. दरम्यान, त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लष्कराला कारवाईचे कोणतेही पुरावे देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमध्ये असून आज त्यांनी जम्मूमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – “काँग्रेसला संंपवण्यासाठी नरेंद्र मोदी- ममता बॅनर्जींनी..,” काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप
दिग्विजय सिंह नेमकं काय म्हणाले होते?
“केंद्र सरकारने सांगितलं की, २०१६ मध्ये भारताने पाकिस्तानातील उरी येथे सर्जिकल स्ट्राइक केला होता, पण याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. भाजपा हा खोटेपणावर आधारलेला पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी जम्मूतील एका कार्यक्रमात दिली होती. तसेच एक व्हिडीओ जारी करत “पुलवामा हल्ल्यात दहशतवाद्यांकडे ३०० किलो आरडीएक्स कुठून आले? यावेळी दहशतवाद्यांसोबत डीएसपी देवेंद्रसिंग पकडला गेला होता. पण त्याची सुटका कशी आणि का झाली? भारताच्या पंतप्रधानांचं पाकिस्तानशी असलेल्या मैत्रीबद्दलही आम्हालाही जाणून घ्यायचं आहे,” अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केली होती.
हेही वाचा – लग्न कधी करणार? पहिली नोकरी कुठं केली? पंतप्रधान झाल्यावर काय करणार? राहुल गांधींची सडेतोड उत्तरे
राहुल गांधींकडून सिंह यांना घरचा आहेर
दरम्यान, आज जम्मूमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना दिग्विजय सिंह यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “हे विधान दिग्विजय सिंह यांचं वयक्तिक विधान असून काँग्रेस पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. तसेच “आम्हाला लष्करावर पूर्ण विश्वास असून लष्कराला कारवाईचे कोणतेही पुरावे देण्याची गरज नाही. सर्जिकल स्ट्राईकबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे”, असेही ते म्हणाले.