मी भाजपा आणि आरएसएसला गुरु मानत असून ते जेवढ्या आक्रमकपणे माझ्यावर टीका करतील, तेवढा काँग्रेस पक्षाला फायदा होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. शनिवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना, अखिलेश यादव यांनी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याबाबत केलेल्या विधानावरही त्यांनी उत्तर दिलं.
हेही वाचा – New Year Celebration: “नवीन वर्ष साजरं करणं ‘हराम’, सैतानालाही….”; रझा अकादमीच्या अध्यक्षांचं विधान
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
“भाजपाने माझ्यावर आक्रमकपणे टीका करावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या टीकेमुळे काँग्रेस पक्षाला आपली विचारधारा समजण्यास मदत होईल. माझ्यावर जेवढी टीका होईल, तेवढा काँग्रेस पक्षाला फायदा होईल. त्यामुळे एकप्रकारे मी भाजपाला माझा गुरू मानत असून त्यांच्यामुळेच मला आयुष्यात काय करू नये, याची शिकवण मिळते”, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा – रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विक्रमी गुंतवणूक – मोदी; पश्चिम बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू
भारत जोडो यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले, “ही यात्रा जेव्हा आम्ही सुरू केली. तेव्हा ती साधारण यात्रा होती. मात्र, त्यानंतर हळू-हळू या यात्रेत लोकं जुळत गेली. आज ही यात्रा सर्वसामान्यांचा आवाज बनली आहे. देशातील विरोधीपक्षदेखील आमच्या बरोबर आहेत. मला कल्पना आहे की राजकीय मतभेदांमुळे काही लोकं या यात्रेत सहभागी होत नाहीत. मात्र, आमची विचारधारा एक आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसची तुलना भाजपाशी करत मला भारत जोडो यात्रेस सहभागी होण्याचं निमंत्रण नाही, असे म्हटले होते. याबाबत विचारलं असता, “भारत जोडो यात्रेचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहे. कोणीही या यात्रेत सहभागी होऊ शकतं. अखिलेश यादव आणि मायावती यांची प्रेमाचे हिंदुस्तान हवा आहे. आमची विचारधारा देखील समान आहे”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.