चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगभरातील देशांच्या काळजीत भर पडली आहे. याबाबत भारत सरकारही सतर्क झालं आहे. त्यातच केंद्रीय आरोग्य मनसुख मंडाविया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना पत्र लिहीत एक आवाहन केलं होतं. ‘भारत जोडो यात्रे’त करोना नियमांचे पालन होत नसेल तर ती स्थगित करण्यात यावी, असे मंडाविया यांनी राहुल गांधींना पत्र लिहीत म्हटलं आहे.
याला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर देत सरकार ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित कारण शोधत असल्याचा आरोप केला आहे. ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमधून हरियाणात पोहचली आहे. हरिणायातील नूंह जिल्ह्यातील घासेडा गावातील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते.
“करोना संसर्गाचा प्रसार होत असून, यात्रा स्थगित करण्यात यावी, असे पत्र सरकारने मला लिहलं आहे. पण, ही यात्रा काश्मीरमध्ये जाणार आहे. ही भाजपाची नवीन कल्पना आहे. ते फक्त यात्रा स्थगित कारण शोधत आहे. मास्क लावा, यात्रा थांबवा करोनाचा प्रसार होत आहे, ही फक्त कारणे आहेत,” असा हल्लाबोल राहुल गांधींनी सरकारवर केला आहे.
“आम्हाला आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेषपूर्ण भारत नको आहे. ‘भारत जोडो यात्रा’ १०० दिवसांपासून सुरु आहे. यात्रेत हिंदू, मुस्लीम, शिख सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला. पण, आम्ही कोणाला त्यांचा धर्म किंवा ते कोणती भाषा बोलतात हे विचारलं नाही,” असे राहुल गांधींनी सांगितलं.
हेही वाचा : आदल्या दिवशी झाली दगडफेक, दुसऱ्या दिवशी चक्क हेल्मेट घालून सभेला हजेरी; भाजपाच्या आमदाराची एकच चर्चा
यात्रेच्या लोकप्रियतेचे केंद्राला वावडे
“चिनी घुसखोरी, महागाई, बेरोजगारी, अशा देशाला बेडसावणाऱ्या विषयांपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी भारत जोडो यात्रेला केंद्राकडून जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोना नियमांचे पालन केले होते का?,” असा सवाल काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केला. “केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांना राहुल गांधींची यात्रा आवडलेली नाही, असं दिसते. लोक यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे यात्रेला केंद्राकडून विरोध केला जात आहे,” असेही अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं.