आरजेडीचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे १२ जानेवारी रोजी ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. राहुल गांधी यांनीदेखील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत, शोक व्यक्त व्यक्त केला. दरम्यान, याच भेटीचा आधार घेत भाजपाने गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांना विषयाचे गांभीर्य समजत नाही. शरद यादव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास गेलेले असताना राहुल गांधी हासत होते, असा दावा भाजपाने केला आहे.
हेही वाचा >>“…तर स्वातंत्र्य मिळायला आणखी काही दशके लागली असती” अमित शाहांचे विधान!
नेमका आरोप काय आहे?
भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. शरद यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शोक व्यक्त करताना राहुल गांधी हसत होते, असे पूनावाला म्हणाले आहेत. ट्वीटद्वारे त्यांनी हा दावा केला आहे. “एकीकडे शरद यादव यांचे कुटुंबीय दु:खात असताना राहुल गांधी हसत आहेत. एक तपस्वी अशा प्रकारचे कृत्य नक्कीच करत नाही. संवेदनशील वेळ असेल तेव्हा शहाणपणाने वागणे गरजेचे आहे. मात्र २०१८ धरम सिंग यांच्या शोकसभेत राहुल गांधी हसत होते. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना ते फोनमध्ये व्यस्त होते,” अशी टीका भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केली आहे.
हेही वाचा >> “संसद नव्हे तर संविधान सर्वोच्च”, उपराष्ट्रपतींच्या विधानावर पी चिदंबरम यांची प्रतिक्रिया
दरम्यान, राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. मात्र शरद यादव यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी शरद यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच मी शरद यादव यांच्याकडून खूप काही शिकलो. शरद यादव हे नम्र स्वभावाचे समाजवादी विचार असलेले नेते होते. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात ठेवले जाईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.