विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील आपल्या भाषणादरम्यान इतर मुद्द्यांसह मणिपूरमधील हिंसाचारावरही प्रकाश टाकला होता. लोकसभा अधिवेशनात मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजीही केली होती. या गदारोळानंतर राहुल गांधी आता मणिपूर दौर्यावर निघाले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून मणिपूर येथील त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील संघर्षग्रस्त राज्याला भेट देण्याची गरज आहे, असा संदेश या दौर्यातून दिला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून मणिपूर कुकी आणि मैतेई समुदायांमधील जातीय संघर्षाने ग्रासले आहे.
जिरीबाम शहराची भेट महत्त्वाची
मणिपूरच्या एक दिवसीय दौर्यात राहुल गांधी जिरीबाम, चुराचंदपूर (जिल्हे) आणि मोइरांग (बिष्णुपूर जिल्हा) या तीन ठिकाणी असणार्या मदत शिबिरांमधील हिंसाचारग्रस्त लोकांना भेटतील. या संकटावर चर्चा करण्यासाठी ते राज्यपाल अनुसुया उईके यांचीही भेट घेणार आहेत. जिरीबाम शहराची त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे, कारण या वर्षीच्या जूनपर्यंत हा चकमकींपासून दूर होता. मात्र, एका हत्येने या भागातील वर्षभराची शांतता भंग केली.
हेही वाचा : आम्ही संसदेत ‘पार्ट टाइमर’ आहोत काय? चिदम्बरम यांच्या टीकेवर उपराष्ट्रपतींचा सवाल
“पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी मेपासून मणिपूरला भेट देत नसल्याबद्दल काँग्रेसने वारंवार नाराजी दर्शविली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून राहुल गांधींनी तीनदा मणिपूरला भेट दिली आहे. हे स्पष्ट आहे की, “आमचे नेते ते करतील, जे पंतप्रधान करणार नाहीत,” असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) नेत्याने सांगितले. त्यांनी असा दावा केला की, यामुळे लोकांना संदेश जाईल की, “पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर असताना, आमचे नेते अशा राज्यातील लोकांच्या पाठीशी उभे आहेत, ज्याकडे इतके दिवस दुर्लक्ष केले जात आहे.”
विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधींच्या भेटी
पंतप्रधान मोदी ८ ते ९ जुलै रोजी रशियाला जाणार आहेत, त्यानंतर ९ ते १० जुलै रोजी ऑस्ट्रियाला जाणार आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना, एआयसीसीचे मणिपूरचे प्रभारी गिरीश चोडणकर म्हणाले, “लोकसभेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांची मणिपूरची ही पहिली अधिकृत भेट असेल. यापूर्वी त्यांनी हातरस आणि अहमदाबादला भेट दिली आहे. हातरसमध्ये ते चेंगराचेंगरीच्या घटनेतील पीडितांना भेटले आणि अहमदाबादला पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना भेटले.
“आम्हाला हे दाखवून द्यायचे आहे की, मणिपूर हा भारताचाच एक भाग आहे. राहुल गांधी यांचा दौरा राजकीय नसून केवळ मणिपूरच्या लोकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी आहे. प्रेमाचा संदेश घेऊन ते तिथे जात आहेत. हिंसाचार सुरू झाल्यापासून राहुल गांधी तिसऱ्यांदा मणिपूरला गेल्याचे पाहून पंतप्रधानही तेथे जातील अशी आम्हाला आशा आहे, असे चोडणकर म्हणाले.
संसदेत मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा वारंवार उचलून धरला आहे. २ जुलै रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘मणिपूरसाठी न्याय’ आणि ‘भारत जोडो’ अशा घोषणा दिल्या. २७ जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणात मणिपूरचा मुद्दा नव्हता. हे अधोरेखित करत मणिपूरमधील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार ए. बिमोल अकोइजम यांनी १ जुलै रोजी मोदी सरकारवर राज्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर
३ जुलै रोजी राज्यसभेत मोदींनी सांगितले की, त्यांचे सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले, “काही घटक आगीत तेल टाकण्याचे काम करत आहेत आणि अशा घटकांना मणिपूरचे लोक नाकारतील.” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचा दौरा केला होता आणि ते तिथे (मणिपूरमध्ये) काही दिवस राहिले, याकडेही मोदींनी लक्ष वेधले. केंद्रात सत्तेत असताना १९९३ मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या गोंधळाचीही त्यांनी काँग्रेसला आठवण करून दिली.
मणिपूरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या त्यांच्या चकित करणाऱ्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली. एआयसीसीचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “प्रत्यक्षात मणिपूरच्या खासदाराने १ जुलै रोजी मणिपूरमधील परिस्थिती लोकसभेत निदर्शनास आणल्यामुळे हे दिसून येते की, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.”
राहुल गांधींच्या या दौर्याचा नेमका उद्देश काय?
काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसला लोकसभेच्या दोन्ही जागा दिल्याबद्दल गांधींचा हा दौरा मणिपूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी आहे. “निवडणुकीपूर्वी गांधींनी दोनदा राज्याला भेट दिली. अगदी मणिपूरपासून त्यांची भारत जोडो न्याय यात्रा (त्यांची दुसरी यात्रा) सुरू केली. आता आम्ही लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या आहेत, लोकांना हे माहीत असले पाहिजे की निवडणुकीनंतरही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत”, असे काँग्रेस नेते म्हणाले. या वर्षी १४ जानेवारी रोजी गांधींनी इंफाळ येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली होती, ज्याचा समारोप १८ मार्च रोजी मुंबईत झाला. यात्रा सुरू करण्यापूर्वी गांधींनी आरोप केला होता की, मणिपूर हे भाजपा आणि स्वयंसेवक संघाच्या द्वेषाच्या राजकारणाचे बळी ठरले आहे.
हेही वाचा : पुरवणी मागण्यांचे आकारमान विक्रमी? विविध योजनांसाठी सुमारे एक लाख कोटींच्या मागण्या
गेल्या वर्षी ३० जून रोजी जातीय हिंसाचार भडकल्यानंतर राहुल यांनी पहिला मणिपूर दौरा केला होता. ते दोन दिवस तेथे राहिले. त्यादरम्यान चुरचंदपूरला जाताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर सायंकाळी ते हेलिकॉप्टरने चुरचंदपूरला पोहोचले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, गांधींनी देशभरातील त्यांच्या अनेक सभांमध्ये मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख केला. निवडणुकीत आंतरिक मणिपूरमध्ये अकोइजाम यांनी सत्ताधारी भाजपाच्या थौनाओजम बसंता कुमार सिंह यांचा १.०९ लाख मतांनी पराभव केला. आउटर मणिपूरमध्ये काँग्रेसच्या अल्फ्रेड कान-नगाम आर्थर यांनी एनडीए सहयोगी एनपीएफच्या काचुई टिमोथी झिमिक यांचा ८५,४१८ मतांनी पराभव केला.