Amul vs Nandini Controversy : कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसोबत दुधाच्या दोन ब्रॅण्डमध्येही राजकारण तापले आहे. अमूल आणि नंदिनी या दोन ब्रॅण्डला घेऊन सध्या राजकारणाचा पारा चढलेला असताना त्यात राहुल गांधी यांनी नंदिनी मिल्क स्टोअरला भेट देऊन गारेगार आइसक्रीमचा आस्वाद घेतला. गुजरातचा ब्रॅण्ड असलेल्या अमूलला काँग्रेसने कर्नाटकात विरोध दर्शविला आहे. राहुल गांधींनी नंदिनीच्या स्टोअरला भेट दिल्यानंतर त्यांनी नंदिनी ब्रॅण्ड आणि कर्नाटकचा सहकारी दूध संघ राज्याचा अभिमान असल्याचे सांगितले. तर भाजपाने काँग्रेसच्या या चालीवर टीका करताना हा केवळ प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप असल्याचा आरोप केला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची कोलार येथे प्रचार सभा पार पडली. त्यानंतर त्यांनी नंदिनी मिल्क पार्लरला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतर नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी या दुकानाजवळचा एक फोटो ट्वीट केला आहे, ज्याला त्यांनी कॅप्शन दिली आहे, “कर्नाटकाचा अभिमान, नंदिनी सर्वात भारी आहे.” काँग्रेसने ‘अमूल विरुद्ध नंदिनी’ या वादात आघाडी घेतल्याचे कळल्यानंतर भाजपानेही या विषयातील राजकीय मलई लुटण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण बंगळुरुचे खासदार तेजस्वी सूर्या यांनीही ट्वीट करीत म्हटले, “राहुल गांधी यांना नंदिनी ब्रॅण्ड चांगला वाटतोय, हे ऐकून बरे वाटले. त्यात काहीच शंका नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी केरळमध्ये नंदिनीला प्रवेश मिळवून द्यावा. जर ते असे करू शकत नसतील तर त्यांचा हा केवळ प्रसिद्धीसाठीचा खटाटोप आहे, हे सिद्ध होईल.”
तेजस्वी सूर्या पुढे म्हणाले की, केरळमध्ये नंदिनीला प्रवेश दिल्याची बातमी राहुल गांधी कधी जाहीर करीत आहेत, याची आम्ही वाट पाहू. १५ एप्रिल रोजी केरळच्या सहकारी दूध संघाने नंदिनीच्या राज्यातील प्रवेशाला विरोध दर्शविला होता. नंदिनीच्या प्रवेशामुळे राज्य सहकारी दूध संघाचे नुकसान होऊ शकते तसेच परस्परांविरोधी अनावश्यक स्पर्धा निर्माण होऊ शकते, अशी भीती केरळ दूध संघाने व्यक्त केलेली आहे.
तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के. अन्नामलाई या विषयावर म्हणाले, “तुमच्या पूर्वजांनी तुमच्याच परिवाराच्या नावाने ब्रॅण्ड स्थापन केले. मोदींच्या भारतात मात्र तसे होत नाही. इथे ब्रॅण्ड्सला प्रादेशिक नावे दिली जातात. जसे की, तामिळनाडूनमध्ये अविन (Aavin), कर्नाटकात नंदिनी. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे प्रादेशिक ब्रॅण्ड्स आता आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्ससोबत स्पर्धा करीत आहेत.”
राहुल गांधींच्या भेटीनंतर कर्नाटक काँग्रेसने सहकारी चळवळीचे यश पुन्हा सांगण्याचा यानिमित्ताने प्रयत्न केला. “नंदिनी हा केवळ एक ब्रॅण्ड नाही तर कर्नाटकचा तो अभिमान आहे. कर्नाटक दूध फेडरेशनशी जवळपास २६ लाख शेतकरी जोडले गेलेले आहेत. यातून २० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सहकाराशी जोडले गेलेल्या १.२५ कोटी लोकांना याचा लाभ मिळत आहे. नंदिनी भारीच आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे युवा नेते बी. वाय. श्रीनिवास यांनी दिली.
हे वाचा >> विश्लेषण: दुधाच्या वाढत्या दराला काय ठरतेय कारणीभूत, नेमकं गणित समजून घ्या
तर काँग्रेस पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सूरजेवाला म्हणाले, “नंदिनी कर्नाटकची शान आहे. भाजपा त्याचे उच्चाटन करू शकत नाही, भाजपा हा ब्रॅण्ड विकू शकत नाही किंवा तो उद्ध्वस्त करू शकत नाही.” तसेच अन्नामलाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना तामिळनाडू काँग्रेसचे कार्याध्यक्ष मोहन कुमारमंगलम म्हणाले की, तुमच्या सरकारचे आभार मानलेच पाहिजेत. तुम्ही लम्पी त्वचारोगावरील लस पुरवण्यासाठी उशीर केला. तसेच तोंड आणि पायाच्या आजारावर लस उपलब्ध न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांचे गोधन गमवावे लागले. कर्नाटक दूध संघाकडे दरदिवशी होणारा १० लाख लिटर दुधाचा ओघ कमी झाला. नंदिनीला संपविण्यासाठी तुम्ही चांगले काम केले आहे.
गुजरातमधील प्रसिद्ध अमूल ब्रॅण्डने बंगळुरुच्या बाजारात आपली उत्पादने आणण्याची घोषणा केल्यानंतर कर्नाटकमध्ये ‘अमूल आणि नंदिनी’ असा वाद सुरू झाला. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरीत, भाजपाला नंदिनीचे अमूलमध्ये विलीनीकरण करायचे आहे, अशी टीका केली. यानंतर कर्नाटकमध्ये यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.