भाजपाशी संगनमत करणाऱ्या २०- ३० लोकांना गरज पडल्यास पक्षातून काढून टाकायलाही तयार असल्याचे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी व्यासपीठावर बोलताना त्यांच्यातला संताप दिसून आला. राहुल गांधी यांनी गुजरातमधील पक्षाच्या काही नेत्यांवर भाजपात सामील झाल्याचा आरोप केला. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, शिवाय काही नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पक्षाशी गद्दारी केल्यास काढून टाकण्याचा इशारा पक्षातल्या लोकांना दिला आहे.
“गेल्या २० ते ३० वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष गुजरातमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण का करू शकला नाही? याचं कारण म्हणजे गुजरातचे नेतृत्व, कार्यकर्ते, पक्षातील जिल्हा अध्यक्ष हे दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. एक जे जनतेसोबत उभे राहतात, त्यांच्यासाठी लढतात, त्यांचा आदर करतात. दुसरा गट अगदी याच्या विरुद्ध आहे जो अलिप्त बसतो, लोकांचा आदर करत नाही आणि भाजपाशी संगनमत करत आहे”, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान शनिवारी अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले.
राहुल गांधी काय म्हणाले?
“आम्हाला २० ते ३० लोकांना काढून टाकावं लागलं तरी आम्ही ते करू. जर तुम्ही काँग्रेसमधून भाजपासाठी काम करत असाल तर तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल, जेणेकरून तुम्ही त्यांच्यासाठी उघडपणे काम करू शकता. त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला भाजपामध्ये काहीच किंमत नाही. जिंकणं आणि हरणं विसरून जा, वरिष्ठ नेत्यांच्या नसानसांतून काँग्रेसचे रक्त वाहत असले पाहिजे. संघटनेचे नेतृत्व अशाच नेत्यांकडे असले पाहिजे. ज्या क्षणी आपण हे करू तेव्हा गुजरातमधील लोकं आपल्या पक्षात येऊ पाहतील आणि आपल्याला त्यांच्यासाठी दारं उघडावी लागतील. आपल्याला निवडणुकांबद्दल काहीच बोलण्याची गरज नाही. हा दोन-तीन वर्षांचा प्रकल्प नाही तर ५० वर्षांचा आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.
“पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना राहुल गांधी म्हणाले, “गुजरातमध्ये विरोधी पक्षाचा ४० टक्के इतका आकडा आहे. हा काही लहान आकडा नाही. गुजरातच्या कोणत्याही भागात आपल्याकडे दोन प्रकारचे लोक आहेत, ज्यापैकी एक काँग्रेसला पाठिंबा देतो आणि दुसरा भाजपाला. पण, काँग्रेसकडे ताकदच नाहीये. आपल्या मतांचा टक्का पाच टक्क्याने जरी वाढला तरी खूप आहे. तेलंगणामध्ये आपण हे प्रमाण २२ टक्क्यांनी वाढवलं आहे. इथे आपल्याला फक्त पाच टक्के हवेत. पण, या दोन्ही गटांना वेठीला धरल्याशिवाय हे साध्य होणार नाही.”
पक्षातील नेत्यांचे मत काय?
माजी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा जेनी थुमर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “ज्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात राहून भाजपासाठी काम केलं त्यांच्यावर कारवाई करण्याचा विरोध करते. जेव्हा एखादा पक्ष ३० वर्षांपासून सत्तेबाहेर आहे, तेव्हा हे स्वाभाविक आहे की काँग्रेसचे सदस्य भाजपाशी हातमिळवणी करू शकतात. एक पक्ष म्हणून आपण त्यांना प्रेरित केले पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. शिवाय एक पक्ष म्हणून आपल्यासमोर मोठा प्रश्न हा आहे की नवीन लोक कधी येतील आणि ते काँग्रेसमध्ये का येतील?”
बैठकीत राहुल गांधींनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होईल अशी राहुल गांधींना आशा असल्याचे प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले. “विरोधी पक्ष काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं पाहिजे. जरी तुम्ही विरोधी पक्षातले असलात तरी जनतेवर तुमचा प्रभाव उमटवू शकतो”, असे वडगामचे आमदार इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.
पक्षातील काही लोकांना राहुल गांधींचे हे वक्तव्य खूप आवश्यक असल्याचे वाटते. “पक्षाच्या हिताविरोधात काम करणाऱ्यांना ओळखून त्यांना काढून टाकल्याने काँग्रेसमध्ये नवी उमेद निर्माण होण्यास मदत होईल”, असं आदिवासी नेते अर्जुन राठवा यांनी म्हटले आहे.
“अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत असलेल्या कार्यकर्त्यांचेही कौतुक करायला हवे आणि राहुल गांधी ते करतात”, असं काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार ललित कागथरा यांनी म्हटले. दुसरीकडे पक्षातील काही लोकांनी राहुल गांधींनी केलेल्या विधानांचा उलट परिणाम होऊ शकतो असा इशाराही दिला आहे.
“८ आणि ९ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनापूर्वी बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागेल”, असं काँग्रेसचे सहकारी राज्य कार्यकारी अध्यक्ष कादिर पिरजादा यांनी सांगितले. तब्बल ६४ वर्षांनंतर हे एआयसीसी होणार आहे. याआधी १९६१ मध्ये अधिवेशन झाले होते.
“काँग्रेस सध्या ‘करो या मरो’ अशा परिस्थितीत आहे. ज्यांनी अजून उड्या घेतल्या नाहीत त्यांना हे तर ठाऊक आहे की भाजपामध्ये त्यांच्यासाठी काहीही नाही. पण व्यवसाय, रिअल इस्टेट किंवा व्यापारी समुदाय तसंच भाजपा सत्तेत असल्याने त्यांचे वैयक्तिक हितसंबंध आहेतच. ज्या प्रकारे अतंर्गत कलह दिसून आला ते रोखणे अत्यंत कठीण होईल, कारण प्रत्येक जण एकमेकांविरुद्ध तक्रार करून खाली खेचण्याचा प्रयत्न करेल. व्यासपीठावरून राहुल गांधी जे म्हणाले ते भाषण म्हणून नक्कीच चांगले आहे, पण नेतृत्वातच ताकद नसेल तर तुम्ही ‘माय वे या हायवे’ असा दृष्टिकोन ठेवू शकत नाही”, असे काँग्रेसच्या एका पदाधिकार्याने म्हटले आहे. अंतर्गत बैठकींमध्ये अनेक पदाधिकारी, अधिकारी तसेच नेत्यांमध्ये कलह दिसून येतो. “गांधींनी जोरदार विधानं केली असली तरी वरचे नेतृत्व असमर्थ आहे. शिवाय अनेकदा एआयसीसी कार्यकर्त्यांसोबतचा संवाद थांबवते आणि राज्य कार्यकारिणीकडून येणाऱ्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नाही, त्यामुळे काँग्रेसने आता मुळापासून नव्याने बदल करणं अपेक्षित आहे”, असे एका नेत्याने म्हटले आहे. तेव्हा आता राहुल गांधींनी हकालपट्टीची भाषा तर केली, पण त्याचा पक्षावर पलटवार होऊ शकतो असा अंदाज चुकीचा ठरणार नाही.