अयोध्येत रामरायाची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. संपूर्ण देशभरातून मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या सोहळ्याला अनुपस्थित आहेत. याचे कारण राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने काढलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाम राज्यातील नगांव जिल्ह्यात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आसामच्या नगांवमधील हैबरगाव येथे दोन तासांहून अधिक काळ थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी बटादरवा थानच्या मार्गावर नाकाबंदी करून ही यात्रा थांबवण्यात आली.
सोमवारी सकाळी ८.२५ च्या सुमारास नगांवच्या रुपाही येथील नाईट हॉल्ट कॅम्पमधून बाहेर पडल्यानंतर बॅरिकेड्स आणि पोलिस कर्मचारी येण्यापूर्वी यात्रा बटादरवा ठाण्याच्या दिशेने निघाली होती. काँग्रेसने यापूर्वी जाहीर केले होते की, २२ जानेवारीच्या आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार ते नगांव जिल्ह्यातील पूज्य संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान आणि वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या बटाद्रवा थानाला सकाळच्या वेळेत भेट देतील.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रा पुढे जाऊ नये, यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यात्रेतील सर्व समर्थकांना पोलिसांनी घेरले. यावेळी जमिनीवर ठिय्या मांडून सर्वांनी ‘रघुपती राघव राजा राम’ गाणे एकसुरात गायले.
सकाळी ९.३० च्या सुमारास काँग्रेस नेते गौरव गोगोई आणि बटाद्रवाचे आमदार सिबामोनी बोरा यांना बॅरिकेड्स हटवून बटाद्रवा थानला भेट देण्याची परवानगी देण्यात आली.
एआयसीसी नेते जयराम रमेश यांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांनी थानला भेट देण्याची मूळ योजना असताना, अखेरीस फक्त दोन आसाम नेत्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. ते परतल्यानंतर यात्रा पुढे जाईल असे ठरले.
मंदिरात प्रवेश नाकारण्याचे कारण काय?
रविवारी, थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी बटाद्रवा मतदारसंघातील काँग्रेस आमदारांना पत्र लिहून कळवले की, राहुल गांधी यांना रविवारी दुपारी ३ वाजेपूर्वी आवारात प्रवेश दिला जाणार नाही. कारण अयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्यामुळे पहाटे हजारो लोक या ठिकाणी जमणे अपेक्षित होते.
विशेष म्हणजे आदल्या दिवशी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीमध्ये माध्यमांशी बोलताना, राहुल यांनी सकाळी नव्हे, तर अयोध्येतील कार्यक्रमानंतर बटाद्रवा थानला भेट द्यावी, असे सुचवले होते.
“राम मंदिर आणि बटाद्रवा यांच्यात स्पर्धा आहे असे होऊ नये… हे आसामसाठी चांगले नाही, यामुळे आमची विनंती आहे की, राम मंदिराचा कार्यक्रम संपल्यानंतर जर ते बटाद्रवा सत्राला गेले तर आम्हालाआवडेल… तिथे कोणतीही स्पर्धा नाही आणि त्यांनी येऊन त्या स्पर्धेची प्रतिमाही तयार करू नये”, असे हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
गोगोई आणि बोरा बटाद्रवा थानला भेट देऊन परतल्यानंतर दिवसभराच्या उर्वरित कार्यक्रमासाठी यात्रा हैबोरगाव येथे निघाली.