काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे यात्रेचे आगामन होणार आहे. असे असतानाच राजस्थानमधील मंत्री परसादी लाल मीना राहुल गांधी यांच्या पदयात्रेची प्रभू श्रीरामाच्या पदयत्रेबरोबर तुलना केल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ राहुल गांधींची पदयात्रा ही ऐतिहासिक पदयात्रा असणार आहे. प्रभू श्रीरामही अयोध्येहून श्रीलंकेपर्यंत पायी गेले होते. परंतु राहुल गांधी त्यापेक्षाही जास्त पदयात्रा करणार आहेत, कन्याकुमारीहून काश्मीरपर्यंत. इतिहास आहे आजपर्यंत कोणीही गेलं नाही आणि कोणी जाणारही नाही. राहुल गांधींची ऐतिहासिक पदयात्रा देशाला बदलण्यासाठी आहे.” असं मंत्री परसादी लाल मीना म्हणाले आहेत.

परसादी लाल मीना यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. राहुल गांधींची प्रभू श्रीरामाशी तुलना करण्यात आलेली नाही. प्रभू श्रीराम आणि राहुल गांधी यांच्या नावत सुरुवातीला ‘रा’ हे अक्षर येते, हा योगायोग म्हणता येईल. मात्र आम्ही प्रभू श्रीराम आणि राहुल गांधी यांच्याशी तुलना करत नाही. राहुल गांधी हे एक माणूस आहेत. तर प्रभू राम हे देव आहेत. राहुल गांधी यांच्याकडे देश पाहात आहे. असं पटोले म्हणाले.

पाहा व्हिडिओ –

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे. तर, भाजपाने राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधलेला आहे. ही यात्रा महाराष्ट्रात चार जिल्ह्यातच गुंडाळली जाणार असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

यासंदर्भात भाजपाने ट्वीटद्वारे “राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार! केरळ सारख्या लहानश्या राज्यात तब्बल २० दिवस थांबून राज्यभर दौरा करणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात मात्र ‘भारत जोडो’ यात्रा फक्त ४ जिल्ह्यातून करायचं ठरवलं आहे.” असं म्हटलेलं आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपची विचारधारा मान्य नसणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरी संघटना यांनी देशाची अखंडता अबाधित राहावी, यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhis bharat jodo yatra is bigger than lord ramas padayatra rajasthan minister parsadi lal meenas statement msr