राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांमुळे शेगाव येथील राहुल गांधी यांची जाहीर सभा विक्रमी झाली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली.पण आता सभेचा जनमानसावर किती परिणाम झाला, काँग्रेसला याचा फायदा भविष्यात होईल का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिक आणि सभेत उपस्थित विविध घटकातील नागरिकांशी संवाद साधला असता वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले.काहींना सभेला झालेली गर्दी फक्त राहुल यांना बघण्यासाठी होती, असे वाटते तर काहींना ‘भारत जोडो’मुळे केंद्रातील सत्ताबदल होईल, असा विश्वास वाटतो. परंतु तरीही गर्दीवरून ती जनमानसावर व्यापक परिणाम करणारी ठरली, असे म्हणणे धाडसाचे होईल, .

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात नांदेड आणि शेगाव येथे जाहीर सभा झाल्या. शेगावच्या सभेला झालेली गर्दी काँग्रेसच्या अपेक्षेपेक्षा अधिक होती. याचे श्रेय काँग्रेसच्या नियोजनाला जाते. पक्षाने ४५ हजार खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मात्र, त्यापेक्षा दुप्पट लोकांनी सभेला हजेरी लावली. मैदानाबाहेरही लोक होते. यामुळे काँग्रेस नेतृत्व सुखावले. मात्र सभेला स्थानिकांचा सहभाग अत्यल्प होता. ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. सभेने स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमधील मरगळ निश्चित दूर झाली. काठावरच्या मतदारांना पर्याय दृष्टिपथास पडला. पण, सभेतील बहुतांश नागरिक केवळ राहुल गांधी बघण्यासाठी आले असतील. तेवढ्यापुरती चर्चा होत असेल तर काँग्रेस ज्या मुद्यांवर मोदी आणि भाजप विरोधात लढू पाहत आहे त्याचे काय? त्यादृष्टीने सभेच्या परिणामाची व्यापकता दिसून येत नाही.

हेही वाचा… महेश लांडगे : क्रीडाप्रेमी आमदार

यासंदर्भात शेगाव येथील उपाहारगृह चालक पिता-पुत्राची प्रतिक्रिया बोलकी ठरावी. ७० वर्षीय व्ही.के. मिश्रा म्हणाले, राहुल गांधी हे आपल्या फायद्यासाठी आले होते. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका. त्यावर त्यांचा मुलगा म्हणाला, काहीही असो राहुल गांधी यांनी यात्रा काढून आणि जाहीर सभा घेऊन एक वातावरण निर्मिती तर केली.

हेही वाचा… मालेगावात वादग्रस्त राजकीय आंदोलनांचा घातक पायंडा 

जाहीर सभेतील काही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली. भेट घेतलेल्या ५ पैकी ३ जणांमध्ये उत्साह दिसून आला. यात्रेमुळे नजिकच्या काळात केंद्रात सत्ताबदल होईल, असे त्यांना वाटत होते. ५ पैकी २ युवकांचेही असेच मत होते. इतरांनी मात्र ते केवळ राहुल गांधी यांना बघण्यासाठी सभेला आल्याचे सांगितले. मोर्शी येथून जाहीर सभेसाठी आलेल्या एका ६५ वर्षीय महिलेने यात्रेच्या निमित्ताने महागाई आणि शेतकऱ्यांकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष हा मुद्दा मांडला. भाजपचे मतदार असलेले शेगावचे विजयकुमार श्रावगी म्हणाले, गांधी कुटुंबातील व्यक्तीला बघण्यासाठी लोक सभेला आले परंतु पक्षाला नवजीवन प्राप्त होईल याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा… विदर्भात ‘भारत जोडो’मध्ये पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व, इतर जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव; स्थानिक नेते गटबाजीतच व्यस्त

अल्पसंख्याक समाजाला बदलाची अपेक्षा

या सभेला अल्पसंख्याकांची संख्या लक्षणीय होती. बौद्ध आणि ओबीसी समाज देखील मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मुस्लीम समाजाला यात्रेमुळे व्यवस्थेत निश्चित बदल होईल अशी आशा आहे. याबाबत शेगावचे ४० वर्षीय अमजद शेख म्हणाले, १२ वर्षांच्या मुलीला घेऊन सभेला गेलो होतो. दीड तास तेथे होतो. एक भारतीय म्हणून आम्हाला परिवर्तन हवे आहे. केंद्रातील सत्ता बदलायला हवी. त्यातून पुढील पिढीला दिलासा मिळेल. यासाठीच काँग्रेसचा कार्यकर्ता नसूनही सभेला गेले होतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhis record break public meeting at shegaon but how much does it affect people print politics