Rahul Narwekar Elected as Assembly Speaker शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विलंब लावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढलेले मावळते विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांचीच या पदावर फेरनिवड होणार आहे. भाजपने त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने मंत्रीपदाचे नार्वेकर यांचे स्वप्न मात्र भंग पावले.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोधपणे निवड झाली आहे. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. सोमवारी सकाळी नार्वेकर यांच्या निवडीची अधिकृतपणे घोषणा होऊन त्यांना अध्यक्षपदी स्थानापन्न केले जाईल. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज सादर करण्याच्या मुदतीत नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. नार्वेकर यांना मंत्रीपदाची आशा होती. पण भाजपने त्यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद सोपविले आहे.
हेही वाचा >>>शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
मावळत्या १४व्या विधानसभेत अडीच वर्षे अध्यक्षपद भूषविताना शिवसेना व राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील निर्णयावरून नार्वेकर हे टीकेचे लक्ष्य झाले होते. विशेषत: विरोधकांनी नार्वेकर यांनी पक्षपातीपणे निर्णय घेतल्याचा आरोप केला होता.
भारदे यांच्यानंतर दुसऱ्यांदा अध्यक्षपद
विधानसभेच्या अध्यक्षपदी लागोपाठ दुसऱ्यांदा निवड होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष आहेत. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७ आणि १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२ या कालावधीत ९ वर्षे ३६२ दिवस असे दोन वेळा विधानसभेचे अध्यक्ष भूषविले होते. नार्वेकर यांनी पहिल्यांदा अडीच वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे.
सर्वांना समान न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल. मंत्रीपद किंवा अन्य कोणत्याही पदापेक्षा अध्यक्षपद हे सर्वोच्च आहे.– राहुल नार्वेकर