सतीश कामत

वडिलांच्या काळापासून असलेली टायपिंग इन्स्टिट्यूट चालवतानाच समाजकारणाची कास धरुन पुढे सरकत सामान्य शिवसैनिक ते शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, असा रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष योगेश उर्फ राहुल सुभाष पंडित यांचा राजकीय प्रवास नोंद घेण्यासारखा आहे. मुळातच हुशार असलेल्या राहुल यांना समाजकारणाची आवड होती. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसतानाही शिवसेनेचे महाविद्यालयीन प्रमुख म्हणून त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तेथून पुढे स्वकर्तृत्वावर नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष ते आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?

रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे वास्तव्य करणारे राहुल हे याच प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या वडिलांची इथे टायपिंग प्रशिक्षण संस्था होती. पंडित घराणे हे मुळचे कोल्हापूरचे. तिथे त्यांच्या काकांची टायपिंग इन्स्टिट्यट आहे. राहुल यांचे वडील सुभाष रत्नागिरीत येऊन स्थायिक झाले. राहुल यांचा जन्मही रत्नागिरीचाच. खालची आळी परिसरात त्यांचं बालपण गेले. शांत आणि हुशार असलेल्या राहुल यांना समाजकारणाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या कानावर बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं पडत होती. याच कालावधीत म्हणजे १९८८-८९ मध्ये शिवसेनेच्या महाविद्यालयीन प्रमुखपदी त्यांची निवड झाली आणि तेथून खर्‍या अर्थाने राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. २००२ साली खालची आळी मित्रमंडळाचे राहुल अध्यक्ष बनले. समाजातील सर्वसामान्य वर्गातल्या लोकांना मदत करणे हा त्यांचा मूळचा स्वभाव. आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहरात ते शिवसेनेचे काम करत होते. तेव्हा रत्नागिरीत शिवसेना-भाजप युती होती. त्यामुळे सर्वच लढतींमध्ये भाजपबरोबर निवडणुक लढवावी लागायची. २००६ साली राहुल यांनी खालची आळी प्रभागातून नगरसेवकपदासाठी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र ती जागा भाजपाच्या वाट्याला गेली होती. तरीही या प्रभागातून मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला. या प्रभागात टिळक आळीचा काही भाग समाविष्ट असल्यामुळे विरोधात असलेला भाजपाचा उमेदवार जिंकून येईल असे चित्र होते; परंतु राहूल पंडित यांनी विविध प्रकारची गणिते मांडत ही निवडणूक जिंकली. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये निवडून आल्यामुळे त्यांचं नाव ‘मातोश्री’पर्यंत पोचलं. शिवाय, आमदार साळवींचं पाठबळ होतंच. निवडणूक जिंकण्याचं तंत्र राहुल या निवडणुकीच्या निमित्ताने शिकले. त्यामुळे पुढे प्रत्येक निवडणुकीत विजयी होत राहिले. २०११ ला त्यांनी रत्नागिरी नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शहरातील विविध प्रभागांमध्ये काम करणार्‍या पंडित यांचं संघटनेतील वर्चस्व वाढत होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांच्या प्रचार यंत्रणेचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. शिवसेना-भाजप युतीचा समन्वय तेव्हा ते साधत होते. त्यामुळे त्यांची ‘पडद्यामागचा सूत्रधार’ अशी ओळख झाली. त्यांच्या येथपर्यंतच्या कामाची दखल घेत राज्यात दीर्घ काळानंतर झालेल्या २०१९ मधील थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रत्नागिरीमध्ये शिवसेनेने अनेक इच्छुकांना बाजूला सारत राहुल पंडित हा नवा चेहरा पुढे आणला. सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तीमत्व, अशी त्यांची असलेली प्रतिमा आणि खासदार विनायक राऊत यांचे पाठबळ यामुळे राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. रिंगणातील दिग्गज उमेदवारांना पराभूत करत त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.

हेही वाचा… रविकांत वरपे : समाज माध्यमांचे समन्वयक ते प्रवक्तेपदाचा प्रवास

नगराध्यक्षपदी बसल्यानंतर राहुल यांच्यावर आमदार उदय सामंत यांचे ‘निकटवर्तीय’ असा शिक्का बसला. तो आजही कायम आहे. नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत राहुल यांनी रत्नागिरी शहरात स्वच्छता अभियानाची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करत केंद्रस्तरीय पुरस्कार मिळवले. पर्यटन महोत्सवाची अनोखी संकल्पना हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला. परंतू कर्तबगारीचे हे टप्पे गाठत असतानाच पक्षांतर्गत तडजोडीमुळे अडीच वर्षात राहुल यांना पायउतार व्हावे लागले. हा काळ त्यांच्यासाठी थोडा अडचणीचा ठरला होता. या घडामोडीत पक्षादेशामुळे त्यांना तीन महिन्यांची ‘राजकीय रजा’सुद्धा घ्यावी लागली. त्यावेळी नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्ष बंड्या साळवींकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर घडलेलं नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्याचं रंगतदार नाट्य चर्चेचा विषय ठरला होता. शिवसेनेतून ते काही काळ बाजूला जाण्यात याची परिणती झाली. पण गेल्या जूनमध्ये ठाकरे-शिंदे गट झाल्यानंतर राहुल हळूहळू पुन्हा राजकीय पटलावर दिसू लागले.

हेही वाचा… रुपेश राऊळ : राडा संस्कृतीतील लढवय्या

जिल्ह्यात नव्याने जम बसवू पाहणाऱ्या शिंदे गटाला लोकांपुढे जाण्यासाठी परिचित, परिपक्व अशा चेहऱ्याची गरज होती. त्यामुळे जिल्हा प्रमुखपदाची माळ राहुल यांच्या गळ्यात पडली. पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा चालू आहे. ते रिंगणात आले तर यापूर्वी विद्यमान खासदार आणि संभाव्य प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांच्या प्रचार यंत्रणेची सखोल माहिती असलेल्या राहुल यांची मदत विशेष उपयुक्त ठरेल, असाही विचार या नियुक्तीमागे असू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या रत्नागिरी दौरा नियोजनातही राहुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा… किशोर कुमेरिया : लढवय्या शिवसैनिक

याचबरोबर, नगर परिषद-नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत. अशा परिस्थितीत कदाचित राहुल पुन्हा एकदा रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे उमेदवार होऊ शकतात आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे अर्धवट सोडावी लागलेली खेळी पूर्ण करु शकतात.

Story img Loader