प्रसाद रावकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले खासदार राहुल शेवाळे यांचे शिवसेनेतील हे दुसरे बंड. मुंबई महानगरपालिकेच्या २००२ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत बंडखोरी करून शेवाळे यांनी शिवसेना-भाजप युतीमधील भाजप उमेदवाराचा पराभव करीत मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला होता. आता दुसऱ्यांदा नवी दिल्लीमध्ये बंडाचा झेंडा फडकवून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंवा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. सत्तेत जाण्यासाठी राजकीय जुळवाजुळव हाच त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीचा गाभा राहिला असून तीच परंपरा शेवाळे यांनी कायम ठेवली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राहुल शेवाळे एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून ट्रॉम्बे गावात कार्यरत होते. अल्पावधीतच त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ट्रॉम्बे गावातील शाखाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ट्रॉम्बे गावात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्तेही सक्रीय होते. दरम्यानच्या काळात २००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि शेवाळे नगरसेवकपदाची स्वप्ने पाहू लागले. मात्र युतीच्या जागा वाटपामध्ये ट्रॉम्बे गावातील प्रभाग भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली. मात्र ते स्वस्थ बसले नाहीत. शिवसेनेची उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी बंडाचा झेंडा फडकविला. ट्रॉम्बे गावामधील प्रभागातून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला. भाजपने या प्रभागातून अनिल ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. राहुल शेवाळे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे युतीमध्ये कुरबुर सुरू झाली होती. मात्र शेवाळे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. अखेर ठाकूर यांचा पराभव करून शेवाळे नगरसेवक म्हणून मुंबई महानगरपालिकेत दाखल झाले. आल्यानंतर लगेचच त्यांनी सत्ताधारी शिवसेनेशी सूत जुळवल्याने शेवाळे यांची बंडखोरी ही त्यांची होती की शिवसेना नेत्यांची मूक संमती होती अशी चर्चा झाली. त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने याच प्रभागातून त्यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. मुंबई महानगरपालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना येथील महाराष्ट्र नगर परिसरातील प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मातोश्रीचा विश्वास सार्थ ठरवित ते विजयी झाले. दरम्यानच्या काळात शेवाळे मातोश्रीच्या निकटवर्तीयांपैकी एक झाले होते. त्याच विश्वासातून मातोश्रीने त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद बहाल करून मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती दिल्या.

राहुल शेवाळे यांनी सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. या चार वर्षांच्या काळात अनेक वेळा शिवसेना आणि भाजपमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून संघर्ष झाला. मात्र महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे या द्वयींनी शीतयुद्धात भाजपला नमते घेण्यास भाग पाडले. दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. देशभरात मोदी लाट उसळली होती. शिवसेना-भाजप युतीमधील जागा वाटपात दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेवाळे यांना उमेदवारी देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. शिवसेनेच्या अनेक मातब्बर नेत्यांना बाजूला सारून शेवाळे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला होता. तो त्यांनी सार्थ ठरविला. त्यावेळी मोदी लाटही शेवाळे यांच्या विजयासाठी कामी आली. काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा तब्बल एक लाख मतांनी शेवाळे यांनी पराभव केला. त्यापाठोपाठ २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने शेवाळे यांनाच उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले.

आता शेवाळे बंडाचा झेंडा खांद्यावर घेत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेना आणि भाजप युती दुभंगल्याबाबत शेवाळे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. २०२४ मधील लोकसभा निवडणूक जिंकायची तर भाजपची साथ आवश्यक असे शेवाळे यांच्या मतदारसंघातील समीकरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही दिल्लीत शेवाळे यांनी भाजपच्या नेत्यांशी व मंत्र्यांशी चांगले संबंध टिकवले. आता शिंदे गटात दाखल झाल्यानंतर शेवाळे हे त्यांचे लोकसभेतील गटनेते म्हणून निवडले गेले आहेत. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून सत्तेचा लाभ मिळेल अशी दाट शक्यता आहे. शिवाय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्यात शेवाळे चांगले योगदान देऊ शकतात, असाही भाजपचा हिशेब आहे.

Story img Loader