अलिबाग : रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र या बालेकिल्ल्याला आता भाजपने सुरूंग लावला आहे. पक्षाची तिन पिढ्या धुरा सांभाळणाऱ्या पाटील कुटूंबात उभी फूट पडली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची वाटचाल अधिकच खडतर होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
गेल्या काही वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस असलेल्या जयंत पाटील यांच्या कुटूंबात सुप्त संघर्ष सुरू होता. जयंत पाटील यांच्या पक्षांतर्गत एकाधिकारशाही बंधू सुभाष पाटील आणि भाचा आस्वाद पाटील यांना फारशी रुचत नव्हती. पण मिनाक्षी पाटील यांनी हा वाद विकोपाला जाणार नाही याची दक्षता घेतली होती. कुटूंबात फूट पडू दिली नव्हती. मात्र मिनाक्षी पाटील यांच्या पश्चात कुटूंबात समन्वय राखेल असा दुवा निखळला. त्यामुळे कुटूंबातील सुप्त संघर्ष पंढरपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशना दरम्यान पहिल्यांचा समोर आला.
चिटणीस मंडळावरील सदस्यांच्या मनमानी नियुक्त्यांना माजी आमदार सुभाष पाटील यांनी जाहीर आक्षेप घेतला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाकडून सुभाष पाटील यांना उमेदवारी नाकारली गेली. मला उमेदवारी देणार नसाल तर जिल्हा चिटणीस असलेल्या आस्वाद पाटील यांना उमेदवारी द्या अशी मागणी सुभाष पाटील यांनी पक्षाकडे केली. पण जयंत पाटील यांनी तिही मागणी फेटाळत, त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे दोन्ही भावंडामधील वाद विकोपाला गेले.
सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील चित्रलेखा पाटील यांच्या निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. त्यामुळे चित्रलेखा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पाटील कुटूंबातील अस्वस्थता आणि सुप्त संघर्ष भाजपने अचूकपणे हेरला. शेकापला त्यांच्यात बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्याची आयती संधी भाजपकडे चालून आली. यानंतर रायगडचे जिल्हा संघटक सतीश धारप आणि प्रदेश कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अलिबागमध्ये ऑपरेशन लोटसला सुरूवात केली. आस्वाद पाटील यांना पक्षात घेण्यासाठी पहिल्यांदा हालचाली सुरू केल्या. नंतर सुभाष पाटील यांनाही पक्षात येण्यासाठी भाग पाडण्यात आले. बुधवारी मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सुभाष पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, भावना पाटील यांच्यासमवेत सात जिल्हा परिषद सदस्य, २ जिल्हा बँकेचे संचालक, ६० आजी माजी सरपंच अशी मोठी फळी भाजपमध्ये दाखल झाली. त्यामुळे पाटील कुटूंबासह शेकापत मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
विवीध पक्षातील प्रस्तापित नेत्यांना पक्षात घ्यायचे आणि संघटनात्मक बांधणी करायची अशी रणनिती भाजपने रायगड जिल्ह्यात आखली होती. पनवेल प्रशांत ठाकूर यांना आणि पेण मतदारसंघात धैर्यशील पाटील आणि रविशेठ पाटील यांना पक्षात घेऊन त्यांनी दोन्ही मतदारसंघ ताब्यात घेतले होते. पेण आणि पनवेल नंतर भाजपने अलिबाग मतदारसंघा लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवातही केली होती. पण शेकापचे ग्रामीण भागात असलेले संघटन हे भाजप समोरील सर्वात मोठे आव्हान होते. सुभाष पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे हा अडसरही दूर होणार आहे.
दुसरीकडे नेते गेले तरी पक्षाला फरक पडणार नाही असा दावा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला आहे. पण पेण मध्ये धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतरही पाटील यांनी असाच दावा केला होता. मात्र त्यानंतर पेण मतदारसंघात शेकापची मोठी वाताहत झाल्याचे दिसून आले होते. सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांची पक्षसंघटनेवर घट्ट पकड होती. ग्रामिण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शेकापची बालेकिल्ल्याची आगामी वाटचाल खडतर ठरणार आहे.