Mahayuti Maharashtra Political News : गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर महायुतीने राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केली. डिसेंबरमध्ये नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. मात्र, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तिढा निर्माण झाला. राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) दोघेही रायगडच्या पालकमंत्रीपदावर अडून बसल्याने हा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. महिनाभरापासून महायुतीचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असताना शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती न केल्यास निश्चितच उठाव होईल, असा इशारा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. मागच्या सरकारचे जे परिवर्तन झाले, ते रायगडमधूनच झालं. आम्ही छत्रपतींचे मावळे असल्याने हा अन्याय कधीही सहन करणार नाही, असंही दळवी म्हणाले. विशेष बाब म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी (१२ एप्रिल रोजी) रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवास्थानी जाऊन ते स्नेहभोजन करणार आहेत. त्याआधीच पालकमंत्रीपदावरून महायुतीत वादाची ठिगणी पडण्याची शक्यता आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून का होतोय वाद?
महायुतीने पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांचं नाव जाहीर केलं होतं. मात्र, शिवसेना शिंदे गटाने या दोन्ही नियुक्त्यांवर आक्षेप घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात भाजपाच्या दिल्लीतील उच्चपदस्थांकडे तक्रारही केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जानेवारीला नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती दिली. तेव्हापासून या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामार्फत हा वाद सोडवला जाणार आहे, असं आता सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी कसं शांत केलं?
भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी आग्रही
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गटाचे भरत गोगावले अडून बसले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही पालकमंत्रीपद सोडण्याची तयारी नाही. नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार असतानाही पालकमंत्रीपदावरचा दावा आम्ही मागे घेतला. त्यामुळेच रायगडचे पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडे कायम राहावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. दुसरीकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोडण्यास शिंदे गटाची अजिबात तयारी नाही. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रायगड दौऱ्यावर येणार आहेत. सुनील तटकरे आणि शिंदे गटातील नेत्यांबरोबर चर्चा करून पालकमंत्रीपदाचा वाद याप्रसंगी सोडवला जाईल, अशी माहिती भाजपातील अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.
रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून उठाव?
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती न केल्यास जिल्ह्यात उठाव निश्चित आहे, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर रायगडला निश्चितपणे न्याय मिळेल. तो न्याय आमच्या बाजूने असेल अशी मला खात्री आहे. आम्ही सर्वजण रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आशावादी आहोत. महाविकास आघाडी व महायुतीच्या काळात रायगडावर नेहमीच अन्याय झाला आहे. पण आता रायगडला जाग आली आहे. अमित शाह हे जेवायला कुठे गेले आणि भेटीला कुठे गेले, यापेक्षा ते शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी येत आहेत, हे महत्वाचे आहे. भरत गोगावले हे छत्रपतींचे मावळे आहेत, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री रायगडला न्याय नक्कीच देतील”, असंही आमदार दळवी यांनी म्हटलं आहे.
‘रायगडचं पालकमंत्रीपद आम्हालाच’
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही पालकमंत्रीपदावरून भाष्य केलं आहे. “रायगड जिल्ह्यात भाजपाचे व शिवसेनेचे प्रत्येकी तीन आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचा एकच आमदार निवडून आला आहे. गेल्यावेळी सुद्धा जिल्ह्याचं पालकमंत्री राष्ट्रवादीलाच मिळालं होतं. यावेळेला त्यांनी आग्रह धरणं ठीक नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवतील. शिवसेनेकडे जास्त आमदार असल्यामुळे आम्हालाच रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल”, या शब्दांत मंत्री संजय शिरसाट यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
अजित पवार पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीही पालकमंत्रीपदावर प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न माध्यमांनी अजित पवारांना आज शुक्रवारी (तारीख ११ एप्रिल) विचारला. यावर उत्तर देताना, “काळजी करू नका रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्री नसले तरी कामं व्यवस्थित सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष आहे. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांसाठी निधी दिला आहे. २२ हजार कोटी रुपयांची सगळीकडे तरतूद केलेली आहे. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा… धीरे… धीरे..” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा : Deputy PM of India : नितीश कुमार उपपंतप्रधान होणार? राजकीय वर्तुळात का होतेय चर्चा?
पालकमंत्रीपदावरून भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया काय?
रायगडपाठोपाठ नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा राजकीय तिढा दिवसेंदिवस क्लिष्ट होत आहे. त्यामागचं कारण म्हणजे, शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या पालकमंत्रीपदावरही दावा केलेला आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे कायम ठेवले जाणार असल्याची माहिती भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अन्य कोणाकडे दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने दिल्याची चर्चा आहे. याबाबत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतप्रदर्शन केलं आहे. नाशिकला पालकमंत्री नाही, तो असायलाच हवा. मात्र पालकमंत्री नाहीत म्हणून फार फरक पडत नाही. जिल्ह्याला तीन मंत्री आहेत. ते विकासकामे करण्यासाठी सक्षम आहेत, असं मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्रीपद इतकं का महत्वाचं?
महायुतीतील तिन्ही घटकपक्षांना कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं मिळालेली असताना आता पालकमंत्रीपदासाठीही इतकी रस्सीखेच का होतेय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पालकमंत्रीपदाबाबत हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं. राज्य सरकारमधील एखाद्या मंत्र्यांकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जातं तेव्हा नावातच ‘पालक’ शब्द असल्यामुळे या मंत्रीपदाची जबाबदारीही त्यातून स्पष्ट होते. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा शासकीय समारंभ असोत, पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो. जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्रीपदावरील व्यक्तीची असते. म्हणूनच पालकमंत्रीपद महत्वाचं मानलं जातं. दरम्यान, पालकमंत्रीपदावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.