हर्षद कशाळकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग- ज्या मतदारसंघात कुठलीही लाट, प्रवाह चालत नाही असा मतदारसंघ म्हणून रायगडचा लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. अगदी १९८४ च्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत देशभर काँग्रेसला यश मिळाले असताना रायगडने विरोधात कौल दिला होता. कायमच हा मतदारसंघ प्रवाहाच्या विरोधात ठामपणे उभा राहिल्याचे चित्र आहे. हाच कल यंदाही कायम राहणार का, याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत १९८४, १९९६, १९९८, १९९९, २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत हा मतदारसंघ प्रवाहाच्या विरोधात होता. देशभरात काहीही वातावरण असले, तरी रायगड जिल्ह्यातील मतदार प्रवाहाच्या विरोधात ठाम पणे उभे राहतात. पूर्वीचा कुलाबा आणि आताचा रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांची बंडखोर वृत्ती या निमित्ताने कायमच समोर येत राहिली आहे. इंदीरा गांधी यांच्या निधनानंतर देशभरात काँग्रेससाठी सहानुभूतीची लाट पसरली. लोकसभा निवडणूकीत ५१४ पैकी ४०४ विक्रमी जागा काँग्रेसच्या निवडून आल्या. मात्र आताचा रायगड आणि त्यावेळीचा कुलाबा लोकसभा मतदारसंघाने शेकापच्या दि. बा. पाटील यांना निवडून दिले. काँग्रेसच्या ए. टी पाटील यांचा दारूण पराभव झाला. त्यांच्यावर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली. बॅरिस्टर ए. आर अंतुले यांनी या निवडणूकीत तराजू निषाणी घेत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांचाही पराभव झाला.

हेही वाचा >>> भाजपला ‘ ठाकरें ‘ ची राजकीय गरज?

१९९६ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकामध्ये देशात पहिल्यांदा भाजपचा प्रभाव दिसून आला. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजप समोर आला. मात्र या निवडणूकीत रायगड जिल्ह्यातील कुलाबा मतदारसंघातून काँग्रेसचे बॅरीस्टर ए आर अंतुले विजयी झाले. १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजप पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. पण या निवडणूकीतही रायगडने शेकापच्या रामशेठ ठाकूर निवडून दिले. भाजपला पाठींबा देणाऱ्या शिवसेनेचे अनंत तरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. १९९९ मध्येही पुन्हा एकदा देशात भाजपचा प्रभाव दिसला. पण निवडणूकीतही रायगडमधून शेकापचे रामशेठ ठाकूर विजयी झाले.

हेही वाचा >>> अयोध्येत रामाचे, तर सीतामढीत सीतेचे मंदिर; जमीन अधिग्रहणाला बिहार सरकारची मंजुरी!

२०१४ मध्ये देशाभरात नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा प्रभाव दिसून आला. या निवडणूकीत रायगडमधून शिवसेनेच्या अनंत गिते विजयासाठी टोकाचा संघर्ष करावा लागला. अवघ्या दोन हजार मताधिक्याने ते निवडून आले. सुनील तटकरे नावाचे अन्य दोन उमेदवार निवडणूक रिंगणात नसते तर गीते यांचा पराभव निश्चित होता. २०१९ च्या निवडणूकीत देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा प्रभाव दिसून आला. देशात भाजपला भरभरून मतदान झाले. पण रायगड मधून भाजपच्या पाठींब्यावर उभ्या असलेल्या शिवसेनेच्या अनंत गिते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावरून प्रवाहाच्या विरोधात मतदान करण्याची रायगडकरांची वृत्ती दिसून येते. म्हणून रायगडचा लोकसभा मतदारसंघ हा लाट, प्रवाहांविरोधात कल देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यावेळीही रायगडचे मतदार प्रवाहा विरोधात उभे राहण्याची पंरपरा कायम राखतात का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad lok sabha constituency voters cast votes against the wave print politics news zws
Show comments