अलिबाग: रायगड जिल्ह्यातून सुनील तटकरेंना उमेदवारी नकोच, म्हणणाऱ्या भाजपने आता त्यांच्याच प्रचारासाठी जोर लावला आहे. तटकरेंना मत म्हणजेच नरेंद्र मोदींना मत म्हणत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. पेण येथील देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने याचीच प्रचिती आली.
ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात महायुतीमधील विसंवाद चव्हाट्यावर आले होते. भाजपने सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तटकरेंना उमेदवारी नकोच अशी आग्रही भूमिका मांडली होती. कोकण संघटक म्हणून जाबाबदारी पाहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक असलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे यंदा भाजपच्या धैर्यशील पाटील यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी केली होती, त्याचवेळी तटकरेना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. मात्र ही मागणी फेटाळून तरीही पक्षश्रेष्ठींनी सुनील तटकरे यांना महायुतीचे उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज होते. ज्या तटकरेंविरोधात पंधरा दिवसापूर्वी वातावरण निर्मीती केली त्याच तटकरेंना मतं द्या असे कुठल्या तोंडाने लोकांना सांगायचे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील प्रचारापासून दूर राहीले होते.
हेही वाचा : जातीय समीकरणं साधत काँग्रेसने हरयाणात जाहीर केले उमेदवार; भाजपाला रोखण्यासाठी विशेष डावपेच
पण आता सुनील तटकरेंना असलेला भाजपचा विरोध मावळला आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते तटकरेंच्या प्रचारात उतरले आहे. पेण येथील उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने याचीच प्रचिती आली. तळपत्या उन्हात पेणच्या नगर परिषद मैदानावर झालेल्या या सभेला हजारोंची गर्दी जमवून भाजपने शक्ती प्रदर्शन केले. जिल्ह्यातील भाजपचे सर्व प्रमुखनेते या सभेला आवर्जून हजर होते. तटकरेंना मत म्हणजेच मोदींना मत अशी भूमिका सर्वांनी यावेळी मांडली. पेण मतदारसंघातून चांगले मताधिक्य देण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांनी दिली. मोदींच्या इंजिनाला रायगडातून तटकरेंची बोगी जोडा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळाली नसली तरी ते योग्य ठिकाणी ते तुम्हाला दिसतील अशी ग्वाही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिली. राजकारणात कोणी कधी कोणाचा शत्रु नसतो असे म्हणतात. याचीच प्रचिती रायगडकरांना या निमित्ताने येत आहे.