अलिबाग- लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या जागेवरून वाद सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते राजीव साबळे यांनी रायगडच्या जागेवर शिवसेनेचाच दावा असायला हवा अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. साबळे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रायगडच्या जागेवरून शिवसेनेच्या शिंदेगटात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.
माणगाव येथील शिवसेना शिंदेगटाचे ज्येष्ठ नेते राजीव साबळे यांनी रायगडच्या लोकसभा जागेवर दावा सांगितला. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद सर्वाधिक असल्याने ही जागा शिवसेनेनी लढवावी, आणि आपण स्वतः ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले. राजीव साबळे यांच्या या मागणीनंतर शिवसेनेत दोन वाद होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण ज्या पक्षाचा खासदार त्याच पक्षाचा उमेदवार हे महायुतीचे सुत्र आहे. त्यामुळे रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवणे योग्य असल्याचा पुनरुच्चार पालकमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. रायगडची जागा शिवसेनेला मिळावी आणि लढवावी, हे राजीव साबळे यांचे वैयक्तिक मत आहे, त्याचा पक्षाच्या भूमिकेशी काही संबध नाही म्हणत हात झटकले आहेत.
हेही वाचा – ए राजा यांच्या ‘त्या’ विधानावर भाजपाकडून संताप व्यक्त; रविशंकर प्रसाद म्हणाले…
हेही वाचा – मध्य प्रदेश भाजपात मोठे फेरबदल, काय आहे भाजपाचा मास्टरप्लॅन?
शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. अजून जागा वाटप झालेले नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील. पण ज्या पक्षाची ज्या ठिकाणी ताकद आहे. त्यांनी ती जागा लढवणे योग्य आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे सहापैकी तीन आमदार आहेत. पण प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या जागांवर दावा सांगत आहेत. आम्ही अजून असा दावा सांगितलेला नाही. आमचे सर्वाधिक आमदार असूनही तिथे इतर पक्ष दावा सांगत आहेत. पण दोन दिवसांत या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल असेही गोगावले यांनी स्पष्ट केले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार असल्याने महायुतीकडून ही जागा त्यांनीच लढवणे योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रायगडच्या जागेवरून शिवसेना शिंदेगटात दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे.