अलिबाग : शेकापचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य लक्षणीय दृष्ट्या वाढले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणूकीत शेकापने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अनंत गीते यांना पाठिंबा देऊन अलिबाग आणि पेण मतदारसंघातून चांगेल मताधिक्य देण्याची ग्वाही दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतर तसे झाल्याचे दिसून येत नाही. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांना अपेक्षित मते मिळाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची मतेही तटकरेंच्या झोळीत पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघ हे शेतकरी कामगार पक्षाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. मात्र आता दोन्ही मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व अडचणीत आले असल्याचे दिसून येत आहे. धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पेण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे अस्तित्व अडचणीत आले आहे. नेते गेले तरी मतदार पक्षासोबत कायम असल्याच्या शेकाप नेत्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
हेही वाचा…‘जरांगे फॅक्टर’ला मुस्लिम मतांची जोड, परभणीत शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य
पेण विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ८८ हजार ७९० एवढे वैध मतदान झाले होते. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना १ लाख १२ हजार ९९५ मते मिळाली तर अनंत गीते यांना ६६ हजार ०५९ मते पडली. मतदारसंघात तटकरेंना तब्बल ४६ हजारांचे मताधिक्य मिळाले. यावरून मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्ष सोबत असूनही गीतेंना अपेक्षित मते मिळाली नाहीत.
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. मतदारसंघात एकूण १ लाख ९३ हजार ४६२ वैध मतदान झाले होते. ज्यात महायुतीच्या तटकरे यांना १ लाख १२ हजार ६५४ मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांना ७३ हजार ६५८ मते मिळाली. याही मतदारसंघात तटकरे यांना तब्बल ३८ हजार ९९६ येवढे मताधिक्य मिळाले. शेकापचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात गीतेंची झालेली पिछेहाट होईल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरली आहे. शेकापचे वर्चस्व असलेल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये तटकरेना चांगले मताधिक्य मिळाले आहे. ही पक्षासाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे.
हेही वाचा…मराठा, मुस्लिम आणि दलित मतांच्या एकजुटीचा दानवे यांना फटका
अवघ्या तीन ते चार महिन्यांनतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत अलिबाग आणि पेण मतदारंसघातून शेकाप महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोकसभेचा निवडणूक निकाल पक्षासाठी धोक्याची घंटा वाजवणारा आहे. त्यामुळे या निकालाचे आत्मचिंतन करून पक्षाला पुढची पाऊले टाकावी लागणार आहेत. जिल्ह्यात शेकाप आणि काँग्रेस हे पारंपारीक विरोधी पक्ष असल्याने विधानसभेला काँग्रेसकडून शेकापला कितपत सहकार्य मिळेल याबाबत साशंकता आहे. अशा वेळी शेकापची आगामी वाटचाल आव्हानात्मक राहण्याची चिन्ह दिसत आहेत.