मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एकेक पाऊल पुढे टाकले आहे. दोघेही एकत्र येणे महाराष्ट्रासाठी चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत नाखूश असल्याचे स्पष्ट पाहायला मिळत आहे. त्यांना ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता, ते चांगलेच भडकल्याचे दिसले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार का, असा प्रश्न निर्माण होतोय. याच एकूण परिस्थितीवर नजर टाकूया.
ठाकरे बंधू एकत्र येणार?
शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांचे एकत्र येणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेचे ठरू शकते. ‘इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हातमिळवणी करण्याचे संकेत दिले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना धक्का बसला असेल. उद्धव आणि राज ठाकरे यांनी यापूर्वीही एकत्र येण्याचे प्रयत्न केले आहेत; मात्र यंदा ते एकत्र येण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कारण- दोघांनीही एकत्र येण्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांच्या सेनेपेक्षा खूपच मागे पडली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आता येणाऱ्या काळात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत.
राज ठाकरे यांनी अभिनेते व सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केले. ते मुलाखतीत म्हणाले, “आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत. आमचं एकत्र येणं कठीण नाही. महाराष्ट्र या सर्वांपेक्षा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे एकत्र येणं – एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही.” तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले, तेदेखील एकत्र येण्यास इच्छुक आहेत. ते म्हणाले, “महाराष्ट्राचे हित सर्वोपरि आहे आणि आमच्यातील मतभेद किरकोळ आहेत.”
ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर शिंदे यांची प्रतिक्रिया
शिंदे यांना त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यमांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल विचारले. तेव्हा एकनाथ शिंदे भडकले आणि कामाबद्दल बोलूया म्हणत हा प्रश्न त्यांनी टाळला, असे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिले. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नाव व निवडणूक चिन्ह मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या पक्षाचे नेते म्हणून उदयास आले आहेत आणि बहुमत असलेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आले आहेत. गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या घरी त्यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यात मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केल्यास शिवसेना (ठाकरे गट) मजबूत होईल आणि शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वारसा बळकावल्याचा आरोपही चुकीचा ठरेल. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडत मनसेची स्थापना केली. शिवसनेतून बाहेर पडण्याचे मुख्य कारण होते, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणून उद्धव ठाकरे यांचा उदय. उद्धव ठाकरे यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यावेळी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिंदे चित्रात कुठेही नव्हते. त्यांना विशेषतः ठाण्यातील नेते म्हणून ओळखले जात असे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ते केंद्रस्थानी आले. ते शिवसेनेतून काही आमदारांसह बाहेर पडले. आता दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे कुटुंबाबद्दल हळवा कोपरा असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने महायुतीची धुरा सांभाळली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नऊ जागा, तर शिंदेंच्या सेनेने सात जागा जिंकल्या होत्या.
भाजपाची वाढती ताकदही शिंदेच्या चिंतेचे कारण आहे. विधानसभा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी बराच काळ प्रयत्न केले; परंतु शेवटी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. त्यांना आपल्या पसंतीचे खाते मिळविण्यासाठीदेखील प्रयत्न करावे लागले. दुसरीकडे, भाजपा त्यांच्यापेक्षा दुसरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना प्राधान्य देत असल्याचा त्यांचा समज आहे आणि हादेखील त्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेच्या नेत्यांनीही ठाकरेंच्या युतीच्या शक्यतेवर टीका केली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी उपहासात्मक टीका करीत म्हटले, “जर ठाकरे बंधू एकत्र आले, तर आम्ही मिठाई वाटू.” पक्षाचे नेते संजय निरुपम म्हणाले, “दोन शून्य शून्य होतात.” तर खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव यांचा उल्लेख आधुनिक दुर्योधन असा केला. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख संजय राऊत यांनी या विधानांची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले, “शिंदे यांची चिंता समजण्यासारखी आहे. काहीही असले तरी त्यांनी कपटी पद्धतींनी आणि विश्वासघाताने सेनेला जिंकले.”
मुख्य म्हणजे मुंबईत ठाकरेंची पकड पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देताना सावधगिरी बाळगताना दिसले. ते म्हणाले : “ते (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येत असतील, तर ते चांगले आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो.” शिवसेनेचा (ठाकरे गट) मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूंच्या निर्णयाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, ठाकरे बंधूंनी एकत्र येणे हा सोनेरी क्षण असेल. ही बातमी ऐकून मी भारावले आहे.