मुंबई: महाराष्ट्राचे सोने गेली अनेक वर्षे लुटले जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पाने एकमेकांना वाटत आहोत. आपल्या हातामध्ये आपट्याची पाने सोडून दुसरे काही राहतच नाही आणि बाकीचे सगळे सोने लुटून चाललेत. म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजचा दसरा हा खूप महत्त्वाचा आहे. या निवडणुकीत बेसावध राहून चालणार नाही. गेल्या पाच वर्षांत नकोे त्या आघाड्या, युती करून तुमच्या मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसऱ्यानिमित्त राज ठाकरे यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (पॉडकास्ट) जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडत जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असून त्यासाठी या निवडणुकीत आपल्या सहकाऱ्यांना साथ द्या, असे आवाहन केले. महाराष्ट्राचे सोने गेली अनेक वर्षे लुटले जात असून आपण मात्र जाती-पातीच्या राजकारणात मश्गूल आहोत. दरवर्षी तुम्ही बेसावध राहता आणि सगळे राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. नुसते रस्ते आणि उड्डाणपूल बांधणे ही प्रगती नाही. आपल्या हातात मोबाइल, घरात रंगीत टीव्ही आला म्हणजे प्रगती नाही तर प्रगती समाजाची व्हावी लागते. पण या सगळ्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे. अजूनही आपण चाचपडतच आहोत. इतक्या वर्षांपासून राजकीय पक्षांकडून प्रगतीच्या थापा मारल्या जात असूनही तुमच्यातला राग व्यक्त होताना दिसत नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : लवकरच राज्यभर दौरे, पंकजा मुंडे यांची घोषणा; गोरगरिबांसाठी कामे करण्याचा निर्धार

‘यंदा मतदारांनी क्रांती केली पाहिजे’

त्याच त्याच लोकांना दरवेळेस निवडून देता आणि नंतर पश्चात्तापाचा हात कपाळावर मारत बसता, अशी जनतेला जाणीव करून देताना ठाकरे यांनी येत्या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या हातात जे मतदानाचे शस्त्र आहे, ते मतदानाच्या दिवशी न वापरता, या लोकांना शिक्षा न करता, नुसती शस्त्र वरती ठेवून देता. निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवर बोलत राहतात. पण, मतदानाच्या दिवशी हा आपल्या जातीचा, हा जवळचा, ओळखीचा आहे असे करून राज्य उभे राहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray appeal to voters ahead of assembly elections 2024 print politics news css