संतोष प्रधान
सरकारचा कारभार, मुंबईचे सुशोभीकरण, बंडानंतर सूरत वारी, अलिबाबा आणि ४० आमदार, न्यायालयावर अवलंबून असलेले पहिले सरकार यावरून टीकाटिप्पणी करीत मनसेेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य तर केलेच पण शिवसेेनेचे धनुष्यबाण चिन्ह झेपेल का, अशी शंका व्यक्त करीत शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपशी जवळीक साधणाऱ्या राज ठाकरे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याने त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
हेही वाचा >>> “मला शिवसेनाप्रमुखपद हवं होतं म्हणून मी पक्ष सोडल्याचा अपप्रचार…” राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यावर मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या एकनाथ शिंदे यांच्याशी राज ठाकरे यांचे चांगले सख्य झाले होते. मनसेच्या शिवाजी पार्क मैदानात झालेल्या दिपावली मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. याशिवाय शिंदे यांनी ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेच. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. मात्र त्याच वेळी ठाकरे यांनी भाजपबद्दल मौन बाळगले. भाजपच्या विरोधात चकार शब्दही ठाकरे यांनी काढला नाही.
एकनाथ शिंदे यांचा उल्लेख अलिबाबा आणि ४० आमदार गेले असा करताना मी चोर म्हणणार नाही, अशी टिप्पणी केली. पण शिंदे यांना अलीबाबाची उपमा दिली. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने मुंबईच्या सुशोभीकरणाचे कौतुक करीत आहेत. त्याची मोठ्या प्रमाणावर जाहीरातबाजी करण्यात येत आहे. पण या सुशोभीकरणावरच ठाकरे यांनी जोरदार टीका केली. सुशोभीकरणाच्या नावाखाली सर्वत्र दिवे लावण्यात येत आहेत. दिवे लावण्यावरून राज ठाकरे यांनी ही मुंबई आहे की डान्सबार अशी शिंदे यांना जिव्हारी लागेल अशीच टीका केली.
बंडाच्या वेळी शिंदे यांनी सूरतवारी केली होती. त्यावरूनही ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर तोफ डागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती तर शिंदे यांनी काय केले, असा सवाल केला.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्याकडे आल्याबद्दलही राज ठाकरे यांनी काहीसा नाराजीचाच सूर लावला होता. शिवसेनेचे धनुष्यबाण एकाला झेपले नाही, दुसऱ्याला तरी झेपेल का, असे वक्तव्य करीत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित केली.
मशिदींवरील भोंगे हटवावेत तसेच भोंग्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनावरून १७ हजार मनसैनिकांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागण्या करीत ठाकरे यांनी शिंदे यांची एकप्रकारे कोंडीच केली आहे. शिवसेना सोडल्यापासून राज ठाकरे हे नेहमीच उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत आले आहेत. पण शिवसेना नाव आणि चिन्ह ताब्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फारच तिखट भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.