भगवान मंडलिक

डोंबिवली : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असत नाही या म्हणीचा प्रत्यय आता कल्याण-डोंबिवलीत येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावल्यानंतर आता गेली अडीच वर्षे एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ सुरू झाले असून कल्याण लोकसभा मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा >>> ‘हात छाटण्‍याच्‍या’ धमकीने देवेंद्र भुयार पुन्‍हा चर्चेत

मनसेच्या डोंबिवलीत कार्यालयात जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली मऊ पायवाट तयार करण्यास सुरुवात केली आहे. याची नांदी म्हणजे ‘आमची मने जुळलेली आहेत. वरच्या तारा जुळल्या की सर्व काही जुळून येईल,’ असे महायुतीचे सूचक वक्तव्य आमदार राजू पाटील यांनी केले आहे. ही दिलमजाई आगामी निवडणुकांची नांदी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीतही एकमेकांच्या सहाय्याने वर्चस्व राखण्याची तयारी मनसे व शिंदे गटाने सुरू केली आहे.

हेही वाचा >>>अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात सोसायटीधारकांच्या ‘मतपेढी’साठी रस्सीखेच सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुपुत्र खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे डोंबिवली जवळील काटई गावचे माजी आ. रमेश पाटील, विद्यमान आ. प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते तसे जुने. या नात्यामधून कधी विस्तव गेला नाही. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका असोत. कल्याण ग्रामीण विधानसभा, कल्याण लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ही सुंदोपसुंदी वेळोवेळी राजकीय, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात व्यक्तिगत पातळीवर उफाळून आली. मागील विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांना टेकविण्यासाठी तगडी फळी मूळ शिवसेनेत असताना शिंदे गटाने उभी केली होती. दिव्यात बाजी पलटली राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले. अगोदरचे या दोन्ही गटातील वाद हे दृश्यचित्रफित, फलकबाजीमधून व्यक्त होत होते. आमदार झाल्यानंतर तंत्रस्नेही आमदार पाटील यांनी आपली वाॅर रूम बळकट केली. या माध्यमातून तत्कालीन पालक-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विकास कामांवरून लक्ष्य करण्यास सुरुवात केली. शीर्षकपत्रांचा (लेटरहेड) भडीमार केला. विकास कामांच्या विषयावर आक्रमक, सर्वाधिक पत्र लिहिण्यात आमदार पाटील नेहमीच आघाडीवर राहिले. या पत्रातून फार काही निष्पन्न होणार नाही याची पुरेपूर खबरदारी शिंदे पिता-पुत्राने घेतली. आमदार पाटील यांनी पत्र दिले, ट्वीटरवर लिहिले म्हणून माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी तात्काळ विकास निधी जाहीर केला नाही. जाहीर केला, पण तो आडमार्गाने जाहीर करून आपल्या खासदार सुपुत्राला त्याचे श्रेय मिळेल याची नेहमीच काळजी घेतली. विकास कामांचे निधी जाहीर झाल्यानंतर आमदार पाटील यांनी हा निधी आणण्यासाठी आपण शासनाकडे पत्रव्यवहार करत होतो. याची माहिती फलकबाजी, ट्वीटरच्या माध्यमातून जनमानसाला दिली.

हेही वाचा >>>महाराष्ट्रात खरगे काय करतील ?

कल्याण लोकसभा हद्दीत आपल्या शिवाय कामे होत नाहीत. आपणच विकास निधी आणू शकतो. हा खासदार शिंदे यांचा बाणा. या हटवादामुळे डोंबिवलीत आपणास नेहमीच भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यामुळे संघ, भाजपची भरभरून मते मिळतात हे खासदार साहेब विसरले. ती बोच सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या मनात घट्ट आहे. कल्याण ग्रामीणमध्ये माजी आ. सुभाष भोईर यांनी शासन निधीतून काही विकास कामे केली. त्याचेही श्रेय खासदारांनी फलकबाजीतून घेण्याचा प्रयत्न केला होता. ही नाराजी भोईर यांच्या मनात होती व आहे. शिवसेेनेतील फुटीनंतर भौगोलिकदृष्या हाकेच्या अंतरावर असूनही भोईर यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले. कल्याण ग्रामीणमध्ये आ. राजू पाटील यांची विकास कामे, निधीच्या माध्यमातून नेहमीच कोंडी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यापेक्षा खासदार शिंदे यांनी अधिक केला आहे. कडोंमपात हद्दीत महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्री चव्हाण अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासाठी प्रयत्नशील होते. तेथेही खासदारांनी पाचर मारली आहे. त्यामुळे चव्हाण नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांना पुत्राच्या सगळ्याच गोष्टी पटत नाहीत, पण बालहट्टापुढे चालत नाही, अशी त्यांची परिस्थती असल्याचे कळते.

दिलजमाई का?

ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात आ. पाटील सर्वाधिक आक्रमक झाले. डोंबिवली, कल्याण ग्रामीणची विकास कामे, निधीच्या विषयांवरून त्यांनी शिंदे पिता-पुत्रांना लक्ष्य केले. जाहीर कार्यक्रमांमध्ये एका व्यासपीठावरून एकमेकांना चिमटे घेण्याची संधी पाटील, शिंदे यांनी सोडली नाही.

पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आशीर्वाद. त्यामुळे कोठुन कोंडी, दबाव येण्याचा प्रयत्न नाही. गेल्या दोन वर्षांच काळात राजू पाटील यांनी विकासाच्या विषयांवरून शिंदेंना सळो की पळो करून सोडले होते. राजू पाटील विकासासाठी निधी मागतात आणि तो शिंदे गटाकडून दिला जात नाही, असा एक संदेश जनमानसात गेला आहे. खा. शिंदे यांनी पाटील यांना शह देण्यासाठी तीर्थरुपांच्या आशीर्वादाने एमएमआरडीकडून सुमारे एक हजार कोटींचा निधी आणला आहे. हा निधी निविदा, आपलाच ठेकेदार नियुक्ती अशा गुंत्यात अडकला आहे. प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही. त्याचे चटके खड्डे, रस्ते दुरवस्थेवरून लोकांना बसत आहेत. खासदारांनी विकास कामांचा डंका पिटला तरी आता संतापाने लोकांचा कल मंत्री चव्हाण, आ. पाटील यांच्या बाजूने सरकायला लागला आहे. याची जाणीव पिता-पुत्रांना झाली आहे. भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी जोरकसपणे कल्याण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार असेल म्हटले असले तरी चक्री राजकारणात सहजासहजी हा मतदारसंघ शिंदे पुत्र सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उध्दव ठाकरे, पत्नी रश्मी, मुलगा आदित्य यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. या सहानुभूतीच्या दगाफटक्याची भीती शिंदे यांना आहे. जागोजागी वैर घेऊन राजकारण केले तर संस्थानाला डंख लागू शकतो. याची वेळीच जाणीव झाल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सुपुत्राला संयमाचा सल्ला दिला आहे. पुत्राने राजू पाटील यांच्या बरोबरचे ट्वीटर युध्द गुंडाळले आहे. सुभेदार दीपेश म्हात्रे ही कुडुमुडुची लढाई आता लढतात. राज्यसभा, मुख्यमंत्री पदासाठी मनसेने विनाअट भाजप, शिंदे यांना साथ दिली.

हेही वाचा >>>तुम्हारे खत में हमारा सलाम !; कृषिमंत्री सत्तार यांची मोफत दिवाळी शिधावाटपातून राजकीय पेरणी

‘वरच्या पातळीवर सूत जुळतय, तर तू खाली का या लोकांशी पंगा घेतोस,’ असे मुख्यमंत्र्यांचे मन पुत्राला सांगत आहे. येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मनसे, भाजपच्या साथीशिवाय शिंदे यांना पुढे जाता येणार नाही. म्हणून मंत्री चव्हाण यांचा रोखून धरलेला रस्ते निधी खुला करून, मनसेच्या डोंबिवलीत कार्यालयात जाऊन खासदार शिंदे यांनी आपली मऊ पायवाट तयार करण्यास सुरुवात केली आहे. याची नांदी म्हणजे ‘आमची मने जुळलेली आहेत. वरच्या तारा जुळल्या की सर्व काही जुळून येईल,’ असे महायुतीचे सूचक वक्तव्य राजू पाटील यांनी केले आहे. ही दिलमजाई आगामी निवडणुकांची नांदी आहे.

Story img Loader